असे बदलत गेले टीम इंडियाच्या जर्सीचे रुपडे


सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरु असून, आता उपांत्य फेरीमध्ये कोणते संघ आमने सामने पहावयास मिळणार याची उत्सुकता जगभरातील क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे. आजवर या स्पर्धेमध्ये ३८ सामने खेळले गेले आहेत. रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी परंपरागत निळी जर्सी परिधान न करता नवी, नारिंगी आणि नेव्ही ब्ल्यू रंगाची जर्सी परिधान केली होती. यापूर्वीही, गेल्या सत्तावीस वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट संघ्याच्या जर्सीमध्ये अनेकदा परिवर्तन करण्यात आले आहे.

१९७५ सालपासून १९८७ सालापर्यंत क्रिकेट विश्वचषकाचे सर्व सामने पांढऱ्या पोषाखामध्ये खेळले जात असत. मात्र १९९२ सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाच्या संघाला निरनिराळ्या रंगांचे जर्सी देण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत ही प्रथा कायम आहे. १९९२ झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना इंडिगो रंगाच्या जर्सी देण्यात आल्या होत्या. या जर्सीवर, खांद्यांवर रंगेबिरंगी स्ट्राईप्स होते. त्याशिवाय या जर्सीवर पुढच्या बाजूला संघाचे नाव तर मागच्या बाजूला खेळाडूचे नाव लिहिलेले असे. १९९६ साली भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचे रूप बदलले. यावेळी संघाला देण्यात आलेल्या हलक्या निळ्या रंगाच्या जर्सीवर पिवळ्या स्ट्राईप्स असून याची कॉलरही पिवळी होती. जर्सीच्या बाह्यांवर आणि पुढच्या बाजूला सप्तरंगी ‘अॅरो’ही होते.

२००३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धानाम्ध्ये भारतीय संघाच्या जर्सीचे स्वरूप पुन्हा एकदा बदलले. यावेळी संघाला देण्यात आलेली जर्सी जरा स्टायलिश होती असे म्हणता येईल. या जर्सीच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाच्या जाड स्ट्राईप्स होत्या. तसेच जर्सीच्या पुढच्या बाजूला भारताच्या तिरंग्याचे ‘ब्रश स्ट्रोक्स’ही असून या स्ट्रोक्सच्या मधोमध संघाचे नाव लिहिले गेले होते. या जर्सीच्या सोबत घालावयाच्या ट्रॅक पँट्सवरही दोन्ही बाजूंना लहानसे तिरंगे बनविले गेले होते. २००७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीय संघाने परिधान केलेल्या जर्सीमध्ये काही बदल करण्यात आले. आधीच्या जर्सीवर असलेले काळे स्ट्राईप्स आता या जर्सीवरून हटविण्यात आले असून, या जर्सीवर संघाच्या नावाच्या फॉन्टमध्येही बदल करण्यात आला होता.

२०११ साली विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या जर्सीचा रंग पूर्वीच्या हलक्या निळ्या रंगापेक्षा थोडा गडद होता. त्यावर संघाचे नाव नारिंगी रंगामध्ये लिहिले गेले असून जर्सीच्या खालच्या बाजूला, दोन्हीकडे तिरंगी पट्टे होते. २०१५ साली भारतीय संघाने परिधान केलेल्या जर्सीमध्ये तिरंग्याचा समावेश नव्हता. प्लेन निळ्या रंगाच्या जर्सीवर पुढच्या बाजूला संघाचे नाव आणि संघाच्या प्रायोजकाचे नाव असून, या जर्सीच्या सोबत घालावयाच्या ट्रॅक पँट्सना नारिंगी रंगाची लायनिंग असून, हे लायनिंग रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनविण्यात आले होते.

Leave a Comment