भगवान शिवशंकरांना कसा मिळाला तिसरा नेत्र – जाणून घेऊ या रोचक रहस्य


भगवान शंकर हे ‘त्रिनेत्रधारी’ आहेत हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. भगवान शंकरांचा तिसरा नेत्र कपाळाच्या मधोमध असून, हा नेहमी मिटलेला असतो. जर शंकरांनी हा नेत्र उघडला, तर जगप्रलय येतो अशी अशी मान्यता पुराणांमध्ये उल्लेखलेली आहे. पण मुळात भगवान शंकरांना हा तिसरा नेत्र प्राप्त झाला तरी कसा यामागे मोठी रोचक कथा सांगितली जाते. महाभारतातील सहाव्या खंडामधील अनुशासन पर्वामध्ये या रहस्याचे विवरण दिले गेले आहे. एका पौराणिक कथेमध्ये नारदमुनींनी या रहस्याचे वर्णन केले आहे. नारदमुनींनी कथन केलेल्या हकीकतीच्या अनुसार एकदा भगवान शंकर यांनी हिमालयामध्ये बोलाविलेल्या सभेमध्ये समस्त देवता, ऋषी-मुनी आणि ज्ञानीजन सहभागी झाले असता, सभेमध्ये अचानक पार्वतीचे आगमन झाले.

पार्वतीने केवळ चेष्टा म्हणून शंकरांच्या मागून येऊन आपल्या दोन्ही हातांनी शंकरांचे दोन्ही डोळे झाकले. पार्वतीने आपल्या हातांनी शंकरांचे डोळे झाकताच संपूर्ण सृष्टीमध्ये अंधःकार झाला. सूर्याचे जणू अस्तित्वच नष्ट झाल्यासारखे भासू लागले. अचानक अंधःकार झालेला पाहून पृथ्वीवरील सर्व जीवजंतू भयाकुल झाले. पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांची ही अस्वस्थता शंकरांना बघविली नाही. त्यामुळे शंकरांच्या कपाळावर एक ज्योतीपुंज आपोपाप प्रकट झाला, आणि त्याद्वारे सृष्टी पुनश्च प्रकाशमान झाली. आणि अश्या प्रकारे शंकरांचा तिसरा नेत्र अस्तित्वात आला.

आपल्या कपाळावर ज्योतीपुंज का प्रकट केले अशी विचारणा जेव्हा पार्वतीने शंकरांकडे केली, तेव्हा असे केले नसते, तर संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता, असे उत्तर शंकरांनी पार्वतीला दिले. शंकरांचे नेत्र हे समस्त सृष्टीचे पालनकर्ते असून, यांच्या शक्तीविना सृष्टी प्राणहीन असल्याची मान्यता असल्याने दोन नेत्र झाकले गेल्यावर तिसरा नेत्र अस्तित्वात आला असल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे.

Leave a Comment