जेट एअरवेज खरेदीवर आनंद महिंद्रांचे हजरजबाबी उत्तर


नवी दिल्ली – जेट एअरवेज विमान कंपनी आर्थिक दिवाळखोरीमुळे टाळे लागण्याच्या मार्गावर असतानाच तेथील कर्मचाऱ्यांचे पुढील भविष्य काय, असा प्रश्न उभा राहिला आहे. एका ट्विटर युजरने अशा स्थितीत थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांना जेट एअरवेज आपण खरेदी करा आणि महिंद्रा एअरवेज असे त्याचे नाव ठेवा, असे सुचवले. आनंद महिंद्रा यांनी यावर त्या युजरला लगेच हजरजबाबी उत्तरही दिले.

त्या ट्विटर युजरचे नाव ललित मथपाल असे असून महिंद्रा यांना त्याने जेट एअरवेज खरेदी करण्याविषयी सुचवले. महिंद्रा यांनी त्याला उत्तर देताना जेट एअरवेज विकत घेणार की नाही, याबाबत थेट उत्तर दिलेले नाही. पण, इंग्रजी भाषेतील एका म्हणीचा वापर करत त्यांनी आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. तुम्हाला जर लखपती बनायचे असेल तर आधी एअरलाइन्स उद्योगात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करा, असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले आहे. एक प्रकारे एअरलाइन्स उद्योगात उतरणे म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे असल्याचे महिंद्रा यांचे म्हणणे असल्याचे या उत्तरावरुन स्पष्ट होत आहे.


नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस महिंद्रा यांचे हे उत्तर पडत आहे. एअरलाइन्स उद्योगात अनेक जणांचा न जाण्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर आनंद महिंद्रा हे फारच सक्रिय असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हातही दिला आहे.

Leave a Comment