असा विक्रम करणारा विराट कोहली एकमेव कर्णधार


बर्मिंगहॅम – भारताचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लागोपाठ पाच अर्धशतके करण्याचा विक्रम केला आहे. तो विश्वचषक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे. काल स्पर्धेतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना खेळवला गेला. विराटने कालच्या सामन्यात ७६ चेंडूत ७ चौकारांच्या साहाय्याने ६६ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील कालचे लागोपाठ पाचवे अर्धशतक ठरले.

विराटने वेस्ट इंडिजबरोबच्या सामन्यात चौथे अर्धशतक झळकावले होते. त्याने त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंचच्या ४-४ अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती आणि कालच्या सामन्यात त्याने पाचवे अर्धशतक झळकावल्याने विराट कोहली विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा फलंदाज आणि कर्णधार म्हणून पहिला खेळाडू ठरला आहे.

विराटने गेल्या पाच सामन्यात अनुक्रमे ८२ (ऑस्ट्रेलिया) , ७७ (पाकिस्तान), ६७(अफगाणिस्तान), ७२(वेस्ट इंडिज) आणि ६६(इंग्लंड) अशा धावा काढल्या आहेत. विराट कोहलीने गेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान २० हजार धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात ७२ धावा काढत ही कामगिरी केली. सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा या दिग्गज खेळाडूंना त्याने याबाबतीत पिछाडीवर टाकले.

Leave a Comment