तिसऱ्या पंचांनी ढापली रोहितची विकेट !


मँचेस्टर – आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील 34वा सामना भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात खेळवला जात आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यात फक्त 18 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही एक धाव काढून बाद झाला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारताला वेस्ट इंडिजचा गोलंदाज किमा रोचने पहिला धक्का दिला. रोहित शर्मा त्याच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक शाय होपकडे झेल देऊन बाद झाला.

रोहित शर्माच्या झेलबादचे अपिल मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावले होते. पण वेस्ट इंडिजने डीआरएस घेतला. यात रोहितला तिसऱ्या पंचांनी बाद दिले. टिव्ही रिप्लेमध्ये रोहित चेंडू बॅटला नाही तर पॅडला लागून गेल्याचे दिसत होते. त्यातही बॅट आणि पॅड दोन्हीही चेंडूच्या जवळ असल्याने नेमका चेंडू कशाला लागला हे स्पष्ट झाले नाही.

रोहित आऊट झाल्याचा व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अल्ट्रा एजमध्ये तिसऱ्या पंचांनी पाहून रोहित शर्माला झेलबाद दिले. रोहितलासुद्धा हा निर्णय दिल्यानंतर धक्का बसला. पंचांचा निर्णय त्याने मान्य केला आणि मैदान सोडले. पण त्याला वाटत होते की चेंडू बॅटला लागलेला नाही. मैदानावरून बाहेर जाताना पंचांच्या निर्णयावर त्याची नाराजी लपून राहिली नाही.

आतापर्यंत चार सामने विराटसेनेने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळे रद्द झाला. आज वेस्ट इंडिजला नमवून भारत सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. पण वेस्ट इंडिजला नमवणे, भारतासाठी सोपे असणार नाही. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कार्लोस ब्रॅथवेटने केलेली तुफानी खेळी सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. वेस्ट इंडिजला केवळ पाच धावांनी पराभव पत्करावा लागल्याने सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या.

Leave a Comment