पाकिस्तानात सोने झाले प्रतितोळा 80 हजार 500


मुंबई : जगभरातील सोन्याच्या दरात इराण आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे वाढ होत आहे. भारतातील सोन्याच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाल्याने 34 हजार 700 रुपयांवर प्रतितोळ्याचा दर पोहोचला आहे. हा दर जळगाव सराफ बाजारातील आहे.

राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव मंगळवारी 200 रुपयांनी वाढून तो 34,470 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर मुंबईतही ट्रेडिंग बंद होईपर्यंत सोने दराने 34,588 रुपयांपर्यंत मजल मारली.

सोन्याचा प्रतितोळ्याचा दर भारतात 35 हजारांपर्यंत पोहोचला आहे. पण अत्यंत गंभीर अशी पाकिस्तानची परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये मंगळवारी सोने दरात तब्बल 1300 रुपयांची वाढ झाल्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल 80 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. भारतात 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आहे, तर पाकिस्तानमध्ये 1 तोळा म्हणजे 11.34 ग्रॅम आहे. पाकिस्तानात 10 ग्रॅम सोन्याचा दर 69 हजार 016 रुपयांवर पोहोचला आहे.

सोने दराने आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे उच्चांक गाठला आहेच, शिवाय देशांतर्गत कारणेही दरवाढीला कारणीभूत आहेत. रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीचं धोरण स्वीकारल्याने गुंतवणूकदार बँकेऐवजी सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला. अमेरिका, चीन, इंग्लंड आणि भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशात व्याजदरात कपात होत आहे. त्यामुळे या सर्व देशांतील गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.

Leave a Comment