श्रीराम व हनुमानाचे भित्तिचित्र इराकमध्ये सापडल्याचा दावा


नवी दिल्ली – भगवान राम व त्यांच्या पायाशी बसलेले हनुमान दिसत असलेले भित्तीचित्र इराकमध्ये सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर्षी जून महिन्यात इराकमध्ये भारताचे एक प्रतिनिधीमंडळ गेले होते, जवळपास इ.स.पू 2000 मध्ये डोंगरावरील कड्यांवर कोरण्यात आलेली लेणी त्यांना तेथे आढळली आहेत. यात एक राजा दिसत असून त्याच्या पायाशी नमन अवस्थेत वानर दिसत आहे. ही लेणी किंवा दगडात कोरलेली शिल्पे भगवान रामाचीच असल्याचा दावा अयोध्या शोध संस्थेने केला आहे. पण याला इराकमधील पुरातत्वखात्यानं व इतिहासकारांनी दुजोरा दिलेला नाही.

या संदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, दरबंद-ई-बेलुला या ठिकाणाच्या एका डोंगराळ भागात ही भित्तिचित्र आढळली आहेत. इराकच्या होरेन शेखान क्षेत्राजवळ हा परिसर आहे. या लेण्यात धनुष्य हाती घेतलेल्या कमरेवर वस्त्र नसलेल्या एक राजा दिसत आहे. त्याच्यासमोर हात जोडलेल्या स्थितीत बसलेल्या वानराचे एक दुसरे लेणे असून ते हनुमानाचे असल्याचा दावा अयोध्या शोध संस्थानच्या योगेंद्र प्रताप सिंह यांनी केला आहे. तर इराकी अधिकाऱ्यांची प्राचीन काळातल्या आदिवासींच्या प्रमुखाचे म्हणजे टार्डुनी यांचे हे लेणे असल्याची अधिकृत माहिती आहे.

जून महिन्यात इराकमध्ये भारतीय राजदूत प्रदीप सिंह राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ गेले होते. उत्तर प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागांतर्गत येणाऱ्या अयोध्या शोध संस्थानने यासाठी विनंती केली होती. एब्रिल वाणिज्य दूतावासातील भारतीय अधिकारी चंद्रमौली कर्ण, सुलेमानिया विश्वविद्यालयाचे इतिहासकार आणि कुर्दिस्तानचे इराकी गव्हर्नर देखील या अभियानात सहभागी झाले होते.

Leave a Comment