सिंगापूर देशाबद्दलची काही रोचक तथ्ये


आताच्या काळामध्ये पर्यटनासाठी साठी जायचे झाले, तर केवळ स्थानिक पर्यटनक्षेत्रांनाच नाही, तर परदेशी भ्रमंती करण्यासही लोक पसंती देत आहेत. त्यामध्ये सिंगापूर हा देश पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरत आहे. विविध धर्मांचे, विविध देशांचे आणि विविध संस्कृतींतून आलेले नागरिक या देशामध्ये एकत्र आले असल्याने अनेक खाद्यपरंपरा, संस्कृती, रीतीरिवाज, भाषा, यांचे वैविध्य या देशामध्ये पहावयास मिळते. या देशावर निसर्गाचाही वरदहस्त असल्याने या देशाला भेट देण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांची संख्या दरवर्षी अधिकच वाढत आहे. अश्या या देशाबद्दलची काही रोचक तथ्ये खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

सिंगापूर हा देश शिस्तप्रियतेसाठी ओळखला जातो. येथे नागरिकांसाठी अस्तिवात असणाऱ्या नियमांचे पालन प्रत्येक नागरिक कसोशीने करीत असतो. या नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्याने केली असल्याने या देशामध्ये अपराधांचे प्रमाण नगण्य आहे. या देशामध्ये प्रत्येक बाबतीतले नियम अतिशय कडक आहेत. या देशामध्ये चुईंग गम खाणे, विकणे आणि बाळगणे कायद्याच्या विरुद्ध आहे. तसेच सार्वजनिक जागी एखादी व्यक्ती थुंकताना किंवा कचरा फैलावताना आढळल्यास एक हजार डॉलर्सचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा ठोठविण्यात येते.

सिंगापूर देशाची एकूण लोकसंख्या सत्तावन्न लाख असून, जितकी लोकसंख्या आहे त्याहून दुप्पट संख्येने पर्यटक या देशाला भेट देण्यासाठी येत असतात. २०१८ साली एक कोटी वीस लाख पर्यटक सिंगापूर भ्रमंतीसाठी आले असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. सिंगापूर देशाचे राष्ट्रीय गीत एक हजार सिंगापुरी डॉलर्सच्या नोटेवर मायक्रो टेक्स्ट स्वरूपात लिहिलेले आहे. या देशाच्या राष्ट्रीय ध्वजातील लाल रंग बंधुत्वाचा, आणि समानतेचा, तर शुभ्र पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. ध्वजावर असलेली चंद्रकोर नव्या आणि विकासाच्या मार्गावर अग्रेसर असलेल्या राष्ट्राचे प्रतीक असून, पाच तारे लोकशाही, शांती, प्रगती, न्याय आणि समानतेचे प्रतीक आहेत. सिंगापूरची औपचारिक भाषा मलाय असून, या देशामध्ये इंग्रजी, चायनीज, तमिळ याही अपुचारिक भाषा आहेत. रस्त्यांवरील सूचनाफलकांपासून मेट्रोमधील अनाऊन्समेंट्स पर्यंत सर्व ठिकाणी या चारही भाषांचा वापर केला जातो.

Leave a Comment