दक्षिण कोरियाबद्दलची ही काही रोचक तथ्ये


दक्षिण कोरिया या देशाला निसर्गाचा वरदहस्त लाभला असून, निळ्याशार पर्वतरांगा, चेरीच्या झाडांनी नटलेली लहान मोठी गावे, प्राचीन बौद्ध प्रार्थनास्थळे, विशाल सागरी किनारा, आणि सेओलसारखी अनेक ‘हाय टेक’ शहरे, ही या देशाची वैशिष्ट्ये आहेत. त्या शिवाय या देशाच्या आणखीही काही खासियती आहेत. या देशामध्ये नागरिकांचे वय मोजण्याची पद्धत वेगळी आहे. या देशामध्ये मुलाचा जन्म होता बरोबरच मूल एक वर्षाचे समजले जाते ! त्यामुळे त्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी एक वर्ष पूर्ण झाले असे न म्हटले जाता, दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारे मूल दोन वर्षांचे झाले असे म्हणण्याची पद्धत येथे आहे.

दक्षिण कोरियन लोक आपल्या सौंदर्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असून, जगामध्ये सर्वाधिक कॉस्मेटिक सर्जरी याच देशामध्ये होतात. २०१४ या एका वर्षामध्ये ९८०,००० कॉस्मेटिक सर्जरी झाल्या असून, ही संख्या दरवर्षी वाढत असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. या सर्जरींमध्ये ‘डबल आयलीड सर्जरी’ ही शस्त्रक्रिया सर्वाधिक प्रमाणावर केली जाते. दक्षिण कोरियन पॉपसिंगर्सचा ‘बीटीएस’ हा बँड, जगातील सर्वाधिक लोकप्रिय म्युझिकल ग्रुप्सपैकी एक असून, या म्युझिकल बँडच्या सात कलाकारांच्या द्वारे देशाला ३.६७ बिलियन डॉलर्सची कमाई, ते भरत असलेल्या आयकरामुळे होत असते. हा बँड जगभरामध्ये अतिशय लोकप्रिय असून, दक्षिण कोरियाला भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांपैकी बहुतांश पर्यटक या बँडचे कार्यक्रम पाहण्यासाठी येत असतात.

दक्षिण कोरियन विद्यार्थ्यांसाठी ‘सुनेउंग’ ही शालांत परीक्षा अतिशय महत्वाची असते. हे विद्यार्थी पुढे विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यास पात्र आहेत किंवा नाही, त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये आपले करियर करावयास हवे हे या परीक्षेवरून ठरत असते. ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असल्याने या परीक्षेच्या दिवशी सकाळपासूनच सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात येतात, बांधकामे थांबविली जातात, इतकेच काय तर विद्यार्थ्यांना एकाग्रपणे परीक्षा देता यावी यासाठी परीक्षेच्या काळामध्ये विमानांची उड्डाणे ही थांबविण्यात येतात ! या देशातील लोकांच्या मनामध्ये ‘चार’ आकड्याचे भय आहे. त्यामुळे हा आकडा बहुतेक ठिकाणी टाळला जातो. लिफ्ट्स, इमारतींचे मजले, घरांचे क्रमांक यांमध्ये ‘चार’ हा आकडा सहसा टाळला जातो.

दर वर्षी चौदा एप्रिल या दिवशी देशातील सर्व ‘सिंगल’ नागरिक ‘ब्लॅक डे’ साजरा करतात. ज्याप्रमाणे प्रेमी युगुले, किंवा दाम्पत्ये चौदा फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ साजरा करतात त्याचप्रमाणे ‘ब्लॅक डे’ हा सिंगल व्यक्तींनी साजरा करायचा दिवस असतो. या दिवशी सर्व सिंगल मंडळी काळ्या रंगांचे पोशाख परिधान करत असून, या दिवशी खास तयार करण्यात येत असलेल्या ‘ब्लॅक बीन नूडल्स’ वर ताव मारतात. सध्याच्या काळामध्ये सर्वांचीच जीवनरेखा असलेल्या इंटरनेटचा स्पीड दक्षिण कोरीयामध्ये २८ एमबीपीएस इतका असून, जगामध्ये इतका जास्त स्पीड कुठल्याही देशामध्ये उपलब्ध नाही. तरीही इंटरनेटचा वापर करीत खेळल्या जाणऱ्या गेमिंग साईट्स या देशामध्ये सोळा वर्षांच्या खालच्या मुलांसाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवल्या जातात. या बाबतीतले नियम अगदी कडक असून, याला ‘शट डाऊन लॉ’ म्हटले जाते.

Leave a Comment