अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचा ‘आर्टिकल १५’ आणि ‘सत्यकथा’ला विरोध


अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी ‘आर्टिकल १५’ आणि ‘सत्यकथा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. बदायू येथे घडलेल्या एका दुर्दैवी प्रकरणावर आधारित ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट असून काही सवर्ण जातींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याची माहिती या चित्रपटात दाखवली जाणार असल्याचे दवे म्हणाले.

समानतेचा आग्रह धरणारे घटनेतील १५ कलम आणि या चित्रपटाचा काही संबंध आहे का? हे तपासणे गरजेचे असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सामाजिक संघटना अथवा वकील यांना दाखवावा आणि त्यानंतरच प्रदर्शित करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दुसरा सत्यकथा नावाचा चित्रपटही सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ब्राह्मण समाजाविषयी या चित्रपटात गलिच्छ शब्द वापरले आहेत. चित्रपटातील कलाकारांच्या तोंडी अनेक चुकीची वाक्ये कोणताही ऐतिहासिक पुरावा आणि आधार नसतानासुद्धा केवळ जातीय तेढ निर्माण करण्यासाठी घालण्यात आली आहेत. ती त्वरित काढण्यात यावी, अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही आनंद दवे यांनी दिला.

आम्ही या दोन्ही चित्रपटांना विरोध दर्शविण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासून या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शक यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. हे चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जे जे करावे लागेल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही आनंद दवे यांनी सांगितले.

Leave a Comment