नव्याने योगसाधना सुरु करण्यापूर्वी घ्या या गोष्टींची काळजी


दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो. वैश्विक स्वास्थ्य, सद्भाव आणि शांतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे हे या खास दिवसाच्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. योगसाधना हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अनुभव आहे. योगसाधनेच्या माध्यमातून मनुष्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, तसेच कुठल्याही प्रकारच्या विकार-व्याधी दूर राहतात. आजकाल शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी योगसाधनेचा पर्याय अनेक जण निवडताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या व्यक्ती नव्याने योगसाधना सुरु करणार असतील त्यांनी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही साधना करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवणार नाहीत.

जर एखादी व्यक्ती पहिल्यांदाच योसाधना करणार असेल, तर त्यासाठी प्रशिक्षणवर्ग लावण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो. योगासने करताना ती कशा प्रकारे केली जावीत, श्वासोच्छवास कशा प्रकारे करावा, इत्यादी सविस्तर माहिती प्रशिक्षण वर्गामध्येच योग्य रित्या मिळू शकते. आसन करताना ते चुकीच्या पद्धतीने केले गेले, तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यताच अधिक असते. योगासने करताना त्यासाठी योग्य असलेले कपडे घालणे महत्वाचे आहे. योगासने करताना अतिशय तंग किंवा अगदी ढिले कपडे घालू नयेत. कपडे आरमदायक, शरीराची हालचाल सहजगत्या होऊ शकेल अशा पद्धतीचे असावेत. योगासने करताना घामही येत असल्यामुळे आरामदायक, सुती कपडे घालण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे. योगसाधनेकरिता वापरली जाणारी चटई किंवा मॅट फार पातळ किंवा फार जाड असून नये. योगासने गाडीवर किंवा बिछान्यावर न केली जाता, मोकळ्या जागेमध्ये जमिनीवर आच्छादन घालून त्यावर केली जावीत.

योगासने करताना त्यातील प्रत्येक मुद्रा (position) किती वेळासाठी रोखून धरायची याची योग्य माहिती घेणे आवश्यक असते. एखादी मुद्रा जास्त वेळ रोखली गेली, तर त्यामुळे त्या स्नायूंमध्ये वेदना होऊ शकते, आणि अगदी कमी वेळाकरिता रोखली गेली, तर त्या आसनाचा म्हणावा तितका फायदा शरीराला मिळू शकत नाही. योगासने करताना घाई-गडबड न करता आसनाच्या प्रत्येक मुद्रेवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. योग्य प्रकारे केला गेलेला श्वासोच्छवास योगसाधनेमध्ये अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे आसनामध्ये श्वासोच्छवास कशा प्रकारे केला जावा याचे मार्गदर्शन तज्ञांकडून घेतले जाणे आवश्यक ठरते.

योगसाधना करताना कधीही जेवल्यानंतर केली जाऊ नये. तसेच एकदम रिकाम्या पोटावरही योगासने केली जाऊ नयेत. योगसाधना करण्यापूर्वी एक तासभर आधी अगदी हलका आहार घेतलेला असावा. त्याचप्रमाणे योगसाधनेनंतर शरीरातील उर्जा वाढलेली असते, त्यामुळे योगसाधना पूर्ण झाल्यानंतर त्वरित स्नान करू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment