घरच्या जेवणाला महाग झालेली आधुनिक पिढी!


आपल्या जेवणाच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. दिवस-दिवस एखाद्या स्वयंपाकघरातील चूल (म्हणजेच शेगडी) न पेटणेही आता अपवाद राहिलेली नाही. लोकही घरात जेवणापेक्षा बाहेरच्या जेवण्याला प्राधान्य देत आहेत. ते रेस्टॉरंटमध्ये जातात किंवा घरीच फूड-अॅपच्या माध्यमातून जेवण मागवतात. खऱे तर आता जेवणातही पौष्टिकतेपेक्षा स्वादिष्टपणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आधिक पिढी घरच्या जेवणाला महाग होत आहे.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआई) या संघटनेने केलेल्या पाहणीतून ही चिंताजनक परिस्थिती पुन्हा समोर आली आहे. संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, भारतात सामान्य कुटुंबातील लोक सरासरी 6.6 वेळा बाहेर जेवायला जातात. सुदैवाची गोष्ट एवढीच की अन्य आशियाई देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. सिंगापूर हा शहरवजा देश अत्यंत पुढारलेला समजला होता. तिथे हेच प्रमाण 30 पर्यंत पोचले आहे. अन्य आशिया देशांपैकी बॅंकॉकमध्ये हे प्रमाण 45 आणि शांघायमध्ये ते 60 आहे. म्हणजेच त्या लोकांच्या घरी महिनो न् महिने चूल पेटत नाही!
बाहेरचे खाणे खाण्याचा हा कल भारतात नवा आहे, मात्र तो झपाट्याने पसरत आहे हे खरे. एक भारतीय कुटुंब सरासरी एका महिन्यात बाहेरच्या जेवणावर 2500 रुपये खर्च करतो. भारतीयांच्या या बदलत्या ट्रेंडमुळे देशातील अन्न उद्योगाचा आकारही सतत वाढत आहे. मुंबईत अन्न उद्योगाचा आकार सर्वात जास्त असून तेथे तो 41,000 कोटी रुपये आहे. दिल्लीत हाच आकडा 31,132 कोटी रुपये आहे आणि बेंगळुरुत तो 20,014 कोटी रुपये आहे.

याचे एक कारण म्हणजे लोकांसमोर आज खाद्यपदार्थांचे असंख्य पर्याय आहेत आणि ते जगभरातील पदार्थांचा स्वाद घेत आहेत. एनआरएआयच्या पाहणीनुसार, मुंबईच्या लोकांना दक्षिण भारतीय जेवण सर्वाधिक पसंत आहे. तब्बल 33 टक्के लोक इटालियन आणि 29 टक्के लोक चायनीज पदार्थांवर ताव मारतात. गंमत म्हणजे उत्तर भारतात दाक्षिणात्य पदार्थांना जास्त पसंती मिळत असतानाच दक्षिण भारतीय लोक उत्तर भारतीय पदार्थांना पसंती देत आहेत. दिल्लीकरांना मात्र आपल्या स्थानिक पदार्थांतच जास्त रस आहे. संपूर्ण भारतात पाहू जाता उत्तर भारतीय पदार्थांना सर्वात जास्त म्हणजे 41 टक्के मागणी आहे. त्यानंतर चायनीज (27 टक्के), दक्षिण भारतीय (27 टक्के), मुगलाई (22 टक्के) आणि इटालियन (16 टक्के) अशी मागणी आहे.

अर्थात ही आकडेवारी साहजिक आहे. जगभरातील चांगले खाद्यपदार्थ मुंबईमध्ये खावयास मिळतात. जागतिक पातळीवरचा असा एकही पदार्थ नसेल जो आपल्या मुंबापुरीत मिळणार नाही. पुण्यासारखे शहरही झपाट्याने हा मान मिळवत आहे. भारताच्या प्रत्येक भागातील अनेक स्थानिक वैशिष्ट्य असलेल्या खाद्यपदार्थांची मजा या दोन शहरांत लुटायला मिळते. पुणे हे तर पेशवेकाळापासून खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात आलेल्या आर्थिक सुबत्तेनंतर त्या ख्यातीत भरच पडली आहे. बाकर वडीसोबतच मिसळ पाव आणि वडा पाव हे पुणेकरांचे आवडते पदार्थ. त्यांची दुकाने आता पावला-पावलावर दिसू लागली आहेत. आता तर पुण्याने पास्ता, पिझ्झा यांसारख्या अनेक कॉंटिनेंटल आणि आंतरराष्ट्रीय पदार्थांशी मैत्री केली आहे.

अन्न पदार्थांच्या या बदललेल्या मागणीमागे काही सामाजिक कारणे आहेत. आता महिलाही पुरुषांप्रमाणेच बाहेर नोकरी करतात. त्यामुळे घरी पदार्थ शिजविण्याएवढा वेळ पती-पत्नी दोघांकडेही नसतो. त्यामुळे साहजिकच बाहेरच्या जेवणाला प्राथमिकता मिळते. तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये क्रयशक्तीही वाढली आहे. त्यामुळे ते अन्न पदार्थांवर जास्त खर्च करू लागले आहेत. म्हणूनच चायनीज खाद्यपदार्थांचे गाडे आता भारतात जवळपास प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.

परंतु याचे परिणामही दिसू लागले आहेत. रस्त्यावर मिळणारे चाट पदार्थ, चायनीज गाड्यांवरील पदार्थ अगदी चवीने आणि नित्यनियमाने खाल्ले जातात. पण ते तयार करताना आरोग्यपूरक नियमांचे पालन होत की नाही, याकडे लक्ष पुरवलं जात नाही. फास्ट फूड किंवा जंक फूड घरात महिन्यातून जास्तीत जास्त तीनदा खावे, असा तज्ञांचा सल्ला असतो. मात्र वर म्हटल्याप्रमाणे सर्रास बाहेरच्या जेवणामुळे शरीराला होणारी हानी त्याच प्रमाणात वाढते. चायनिज फास्ट फूड खाणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असते आणि अशा लहान मुलांना मोठेपणी जीवनशैलीशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो, असे निष्कर्ष अनेक संशोधनातून निघाला आहे.

एकेकाळी परवडत नाही म्हणून बाहेर जेवण करणे टाळणारी आणि डबा बांधून नेणारी पिढी आता मागे पडली. सध्या जमाना आहे कुरकुरे, बर्गर आणि सोडाचा. यालाच काही जण आधुनिकता म्हणतात. मात्र आधुनिकतेच्या नादात एक पिढी घरच्या जेवणाला महाग झाली त्याचे काय?

Leave a Comment