‘स्पायडरमॅन’बद्दलची ही रोचक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?


आपल्या मनगटातून सोडलेल्या जाळ्यांवर लटकत वेगाने प्रवास करणारा आणि गरजूंची मदत करणारा ‘स्पायडरमॅन’ कॉमिक्सच्या रूपाने गेल्या काही दशकांपासून आपल्या सर्वांना परिचयाचा आहेच, पण आता हे ‘मार्व्हल कॅरेक्टर’ चित्रपटरूपाने दर्शकांच्या भेटीला आल्यापासून स्पायडरमॅन लहान-मोठ्यांचा आवडता सुपरहिरो ठरला आहे. पण ‘स्पायडरमॅन’ कॉमिक्सच्या रूपाने आपल्या भेटीला येण्यापूर्वी हा सुपरहिरो लोकप्रिय ठरेल याची शाश्वती ना ‘स्पायडरमॅन’ची निर्मिती करणाऱ्या स्टॅन ली यांना होती, ना या कॉमिक्सचे प्रकाशक मार्टिन गुडमन यांना. त्यामुळे एका अजिबात खप नसलेल्या कॉमिक्समध्ये ‘स्पायडरमॅन’ सिरीज प्रकाशित केली गेली, आणि त्यानंतर ते कॉमिक्स आणि ‘स्पायडरमॅन’ यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. अशा या आपल्या आवडत्या सुपरहिरोबद्दल आणखी काही रोचक तथ्ये जाणून घेऊया.

‘स्पायडरमॅन’ कॉमिक्स रूपाने आपल्या सर्वांच्या भेटीला येऊन अनेक दशकांचा काळ उलटून गेला असला, तरी त्याला चित्रपटरूपाने आपल्या समोर येणासही अनेक वर्षांचा कालावधी लागला. १९८०च्या दशकामध्ये सुपरहीरोंचे चित्रपट फारसे बनविले जात नव्हते आणि लोकप्रियही होत नव्हते, त्यामुळे ‘मार्व्हल’ ने ‘स्पायडरमॅन’चे अधिकार ‘कॅनन फिल्म्स’ला अवघ्या २५०,००० डॉलर्समध्ये विकले. त्यानंतर ‘कॅनन’ने हे अधिकार १९९१ साली ’21st century’ ला विकले. असेच अनेक चित्रपट कंपन्यांकडे ‘स्पायडरमॅन’चे अधिकार जात येत राहिले. अखेरीस १९९९ साली मार्व्हलनेच या चित्रपटाचे अधिकार पुन्हा आपल्या हाती घेतले आणि २००२ साली स्पायडरमॅन प्रथमच चित्रपटरूपाने दर्शकांच्या भेटीला आला.

‘स्पायडरमॅन’ ची भूमिका मोठ्या पडद्यावर टोबी मॅकग्वायर या अभिनेत्याने साकारली असली, तरी या भूमिकेसाठी प्रथम इतर अभिनेत्यांची नावे विचाराधीन होती. त्यामध्ये टॉम क्रुझ, चार्ली शीन, जेम्स फ्रँको आणि लियोनार्डो डी काप्रियो या प्रसिद्ध अभिनेत्यांचाही समावेश होता. इतकेच नव्हे तर सुप्रसिद्ध पॉप गायक मायकल जॅक्सन याने, स्पायडरमॅनची भूमिका त्याला स्वतःला साकारता यावी या करिता बुडीतखाती चाललेली मार्व्हल कंपनी खरेदी करण्याची देखील तयारी दर्शविली होती. सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी देखील ‘स्पायडरमॅन’चे दिग्दर्शन करण्याची तयारी दर्शविली होती. या चित्रपटातील स्पायडरमॅनची कथा मूळ कथेपेक्षा वेगळी असून हा स्पायडरमॅन जेम्स कॅमरून यांच्या लेखणीतून साकारला होता. स्क्रिप्ट तयार झाली खरी, पण या चित्रपटाची निर्मिती करीत असणाऱ्या कंपनीने पैश्याच्या अभावी दिवाळखोरी जाहीर केल्याने या चित्रपटाचे काम तिथेच थांबले. त्यानंतर कॅमरून यांनी ‘टायटॅनिक’चे दिग्दर्शन केले.

चित्रपटामध्ये स्पायडरमॅन या पात्राचे खरे नाव पीटर पार्कर असून, राहता पत्ता ‘२०, इंग्राम स्ट्रीट’ असा असून, हा पत्ता खरोखरच अस्तित्वात आहे. आणि विशेष योगायोग म्हणजे या पत्त्यावर वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाचे आडनाव देखील ‘पार्कर’च आहे. या पत्त्यावर राहणाऱ्या सुझान आणि अँड्र्यू पार्कर या दांपत्याला दोन मुली असून, १९७४ सालानंतर हे कुटुंब या घरामध्ये राहत होते. २००२ साली प्रदर्शित झालेला, स्पायडरमॅन हा चित्रपट पहिल्याच ‘ओपनिंग वीकेंड’मध्ये शंभर मिलियन डॉलर्सची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. तीन मे २००२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या दोन दिवसांमध्ये, म्हणजे पाच मे पर्यंत या चित्रपटाने ११४.८ मिलियन डॉलर्सची कमाई केली. त्यानंतर स्पायडरमॅन सीरीजच्या २००४ आणि २००७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनीही सुरुवातीच्या चित्रपटाच्या कमाईच्या ११४.८ मिलियन डॉलर्सच्या कमाईपेक्षा अनुक्रमे ४०.४ मिलियन आणि ५९ मिलियन डॉलर्स अधिक कमाई केली होती.

Leave a Comment