‘कलर्ड’ केसांची उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या काळजी


आताच्या काळामध्ये केसांना ‘कलर’ करणे केवळ वयस्क लोकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. एके काळी वाढत्या वयाच्या खुणा लपविण्यासाठी पांढरे होत असलेले केस काळे करण्यासाठी कलप लावण्याची पद्धत होती. मात्र आजकालची तरुण पिढी आपल्या केसांवर निरनिरळ्या रंगांचे डाय आजमावणे पसंत करीत आहे. अगदी ब्राऊन, बर्गंडी इथपासून हिरवे, गुलाबी, सोनेरी (blond) आणि इतरही बरेच रंग आजची तरुण पिढी मोठ्या हौशीने पसंत करीत आहे. कलर केलेल्या केसांमुळे केस आकर्षक दिसत असले, तरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मात्र कलर्ड केसांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. यासाठी काही साध्या टिप्स अवलंबल्याने कलर्ड केसांची काळजी घेणे सोपे होते.

कलर्ड केसांच्या देखभालीसाठी खास कलर्ड केसांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रोडक्ट्चा वापर करावा. कलर्ड केसांसाठी खास ‘कलर केअर शँपू’ आणि कंडीशनर बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात. त्याशिवाय ‘सीरम’ आणि ‘एसपीएफ’ व ‘युव्ही प्रोटेक्शन’ असेलेल्या ‘लीव्ह-इन’ कंडीशनर चा उपयोग कलर्ड केसांसाठी करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे केस कोरडे पडू नयेत यासाठी या प्रोडक्ट्सचा उपयोग आवश्यक ठरतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हात बाहेर पडण्यापूर्वी केस चांगल्या प्रकारे स्कार्फ किंवा रुमालाने झाकून घेणे गरजेचे आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे केसांच्या कलरची छटा फिकी पडू लागते. त्यामुळे केस कलर्ड असतील, तर उन्हामध्ये फिरताना ते चांगल्या प्रकारे झाकले असण्याची दक्षता घ्यावी.

केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या कलरमध्ये अनेक तऱ्हेची रसायने असतात. त्यामुळे या कलर्सच्या वापराने केस आधीच थोडे रुक्ष होतात. त्यातून उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे केस आणखीनच कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. अशा वेळी उन्हाळ्यामध्ये केसांना नियमित तेल लावून मसाज करण्याची आवश्यकता असते. तसेच तेलाने मसाज केल्यानंतर गरम पाण्यामध्ये जाड टॉवेल भिजवून तो घट्ट पिळून केसांच्या भोवती गुंडाळल्याने केसांवरील तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे केसांच्या कोरडेपणा दूर होऊन केस मुलायम राहतात. केसांना लावलेले तेल किमान चाळीस मिनिटे केसांवर राहू देऊन त्यानंतर थंड पाण्याने केस धुवावेत. कलर्ड केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळावा.

Leave a Comment