पाकवरील विजयानंतर सोशल मीडियावर मीमस्चा पाऊस


नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह पाक खेळाडूंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची अनेकांनी गमतीशीर ट्विटर करत फिरकी घेतली आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन यांच्याबद्दल अवमानकारक जाहिरात केली होती. काहीजणांनी हा संदर्भ घेत रोहित शर्माला अभिनंदनच्या रुपात दाखवून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे.

ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट मंडळाला क्रिकेट प्रेमींनी लक्ष्य केले आहे. अशा एका ट्विटमध्ये पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार सरफराज विराट कोहलीला विचारतो, प्रत्येकवेळी तुम्ही कसे जिंकता ? त्यावर विराट म्हणतो, मला वाटते, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पाकिस्तानच्या सैन्यदलाने विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर हेच उत्तर त्यांनी दिले होते. त्याविषयावरून खिल्ली उडविणारी जाहिरात पाकिस्तानमधील चहा उत्पादक कंपनीने केली होती.

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज कोहलीबरोबर विश्वचषक घेतलेल्या फोटोत ‘फादर्स डे’ची तुलना ही भारत व पाकिस्तान सामन्याबरोबर केली आहे. विश्वचषक जर पाकिस्तानला जिंकायचा असेल तर त्यांना युगांडा, रशिया, कॅनडा एवढेच नव्हेतर व्हॅटेकिन सिटी असे स्पर्धक असायला हवेत. ते तरच विश्वचषक जिंकू शकतील, अशी खिल्ली एका युझरने उडविली आहे. नाणेफेक पाकिस्तानने जिंकली होती, याची आठवण करून देत एका युझरने पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अभिनंदन केले आहे. विश्वचषक स्पर्धेत सलग सातव्यांदा भारताने पाकिस्तानचा पराभव केला. अबकी ‘बार सातवी बार’ असे म्हणत ‘बाप बाप होता’ आहे, असे युझरने म्हटले आहे.

त्याचबरोबर सोशल मीडियात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद हा जांभई देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका युझरने हाच धागा पकडत सरफराज अंथरुणात झोपलेला दाखविला आहे. जोपर्यंत हा खेळाडू आहे, तोपर्यंत काही खरे नाही, अशा अर्थाने ट्विट केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारताकडून पराभव झाल्याने पाकिस्तानात टीव्ही फोडण्यात येत असल्याचे स्क्रीनशॉट्स काही जणांनी पोस्ट केले आहेत.

Leave a Comment