अमित ठाकरेंच्या भेटीला रोहित पवार


मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अमित राज ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुंबईत खासगीरित्या भेट घेतली. राजकीय वर्तुळात पवार आणि ठाकरे घराण्यांच्या वारसदारांनी एकमेकांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

काल दुपारी दीडच्या सुमारास मुंबईच्या लोअरपरेल येथील फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये दोघांनी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा चालली. रोहित आणि अमितने सोबत जेवणही केले. याआधी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. यावरून राज यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जवळीक झाली असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तर राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत केल्याच्या चर्चा रंगत होत्या.

दिवसेंदिवस युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची क्रेझ वाढत असल्यामुळे राजकारणात अमित ठाकरेंना सक्रिय करण्याची कुजबुज सुरू झाली आहे. भाजप-शिवसेने विरोधी तोफ राज ठाकरे यांनी डागली असली तरी लोकसभा निवडणुकीत त्याचा फारसा परिणाम न जाणवल्यामुळे शिवसेनेला रोखण्यासाठी ठाकरे वॉर पुन्हा सक्रिय करण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची चर्चा आहे.

राज यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घ्यावे असा सूर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. अमित ठाकरे यांचा फुटबॅाल हा आवडता खेळ आहे. सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे त्यांनी निमंत्रण दिले असल्याचे रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवरील पेजवर स्पष्ट केले.

यावेळी फुटबॉल सोबतच अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांनी तरुणांशी चर्चा केली. तसेच यावेळी पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे तरुण कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठीच्या उपायांवर चर्चा झाली. युवक म्हणून पक्षबांधणीचे काम करत असताना आम्हाला या तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. योग्य विचारांवर चालणाऱ्या, या विचारांचे समर्थन करणाऱ्या अशा तरुणांमागे आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Comment