सावधान! दक्षिण भारतात पसरताहेत इसिसची पावले!


राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्आयए) बुधवारी तमिळनाडूत अनेक ठिकाणी धाडी टाकून काही जणांना ताब्यात घेतले. इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरून एन्आयएने या लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे भारतात इस्लामिक स्टेटचे (इसिस) जाळे पसरले असल्याचे स्पष्ट झाले असून जिहादी आतंकवाद्यांनी भारताला पोखरले आहे, हेही उघड झाले आहे. एन्आयएने टाकलेल्या या धाडीत महंमद अझरुद्दीन या संशयित दहशतवाद्यालाही जेरबंद करण्यात आले आहे. हा अझरुद्दीन हा श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या दहशतवाद्याचा फेसबुकवर मित्र असल्याचे सांगितले दाते. तो केरळ आणि तमिळनाडू येथे मुसलमान तरुणांची इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्याचे काम करत होता. दक्षिण भारतात घातपात करण्याचा त्याचा कट होता, असे सांगितले जात आहे.

इसिस ही मुख्यतः सीरिया आणि इराकमधील आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना. तिथे अनेक देशांच्या मिळून तिचा पाडाव केल्यामुळे इसिसचे सैनिक विखुरले गेले आहेत. त्यानंतर खवळलेल्या इसिसने आत्मघाती हल्ल्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्याच मालिकेत श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. त्यात 253 जण मारले गेले होते. या कटाचा सूत्रधार असलेला हाशमी हा दक्षिण भारतातील काही लोकांशी गेल्या 3 वर्षांपासून संपर्कात होता. तो येथे इस्लामिक स्टेटचे तळ उभारण्यासाठीही साहाय्य करत होता. हाशमी हा सोशल मीडियात केरळ आणि तमिळनाडू येथून इस्लामिक स्टेटमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांना हेरून त्यांना जाळ्यात ओढत असे.

एनआयएने तमिळनाडूतील कोईम्बतूरसह अन्य सात ठिकाणी धाडी टाकल्या. पोतनूर येथे अझरुद्दीन उक्कादम, सद्दाम, अकबर; कुणियामतूर येथे अबूबकर सिद्दीक आणि अल अमीन कॉलनीमध्ये वास्तव्य करणारा इधियाथुल्ला यांच्या घरीही एनआयएने धाडी टाकल्या.

‘श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचा भारताशी संबंध आहे का,’ याचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक श्रीलंकेत गेले होते. तेथून माहिती घेतल्यानंतर या पथकाने या धाडी टाकल्या आहेत.

इसिसने काही दिवसांपूर्वीत भारतात आपला पहिला ‘प्रांत’ स्थापित करण्यात यश आले असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये एक दहशतवादी चकमकीत मारला गेला होता. या दहशतवाद्याचा संबंध याच संघटनेशी होता. त्यानंतर शुक्रवारी इसिसच्या एमाक या वृत्तसंस्थेने ही घोषणा केली होती आणि ‘विलायाह ऑफ हिंद’ असे या प्रांताचे नाव असल्याचे म्हटले होते.

तमिळनाडू आणि शेजारच्या केरळमध्ये इस्लामी कट्टरवाद वाढत असून त्यामुळे इसिसची पावले पसरत असल्याचा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे. केरळमधील सुमारे 100 तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी भारताबाहेर गेले असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. या संदर्भात लोकसभेतही 20 डिसेंबर 2017 रोजी केरळच्या खासदार विजिता सत्यानंद यांनी प्रश्न विचारला होता. केरळचे 100 जण इसिसमध्ये गेले आहेत का आणि गेले असल्यास सरकारने या संदर्भात कोणती पावले उचलली, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर तत्कालीन गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसमध्ये प्रत्यक्ष सामील असलेल्यांची खूप कमी प्रकरणे केंद्रीय व राज्य सुरक्षा यंत्रणांना आढळली आहे.
मात्र एनआयएने इसिसचे कार्यकर्ते व त्यांच्याशी सहानुभूती बाळगणाऱ्यांच्या विरोधात 103 आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 16 गुन्हे तेलंगाणात, केरळमध्ये 14, कर्नाटकात 6 आणि तमिळनाडूत 5 प्रकरणे दाखल आहेत.

इतकेच नव्हे तर केरळमधील पाच जिल्ह्यांमध्ये झालेल्या आंतरधर्मीय विवाहांचा संबंध इसिसशी असल्याच्या संशयावरून केरळ पोलिसांनी अशा विवाहांची चौकशी सुरू केली आहे. कन्नूर, कासरगोड आणि पलक्कड जिल्ह्यांमध्ये झालेल्या विवाहांच्या संदर्भात पोलिसांना मिळालेल्या तक्रारींच्या आधारे ही चौकशी करण्यात येत आहे. पलक्कड जिल्ह्यात नोंदणी झालेल्या काही प्रकरणांचा इसिसशी संबंध आहे, असा संशय विविध यंत्रणांनी व्यक्त केले आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून ‘इसिस’विषयी माहिती घेण्याचे सर्वाधिक प्रमाण केरळमध्ये आहे. यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या दाक्षिणात्य राज्यांचा क्रमांत लागतो, असेही गुप्‍तचर यंत्रणांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतात इसिसच्या या काळ्या पावलांचा धोका ओळखून सरकारने तिच्या नाड्या आणखी आवळल्या पाहिजेत. ही काळाची गरज आहे.

Leave a Comment