भाषा शिका, भविष्य घडवा


सरकारी शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात होता. मात्र तेवढ्यावरून तमिळनाडूत जनआक्रोश उफाळल्याचे चित्र निर्माण झाले. कस्तुरीरंगन समितीच्या त्रिभाषा सूत्राच्या शिफारशीला प्रमुख द्राविडी राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारला मसुद्यातील ही तरतूद मागे घ्यावी लागली. परंतु तमिळनाडूतील राजकीय नेते एवढ्यावरच थांबलेले नाहीत. ते आपले द्विभाषीय सूत्रच अमलात आणण्यावर ठाम आहेत. इतर भाषांचा अभ्यास हा त्यांना केवळ पर्यायी आहेत.

त्यांच्या या मागणीला पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटकासारख्या राज्यांतूनही पाठिंबा मिळाला. त्यामुळे तरुण पिढीला अन्य भारतीय भाषा शिकू देण्यास येथून पुढे प्रतिबंधच करण्यात येईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच भाषेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते, त्यात अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे किंवा विरोधामुळे युवा पिढीला भारतीय भाषा शिकणे अशक्यच होईल का, असेही वाटू लागते.

वास्तविक दुसरी भाषा शिकण्याचे अनेक फायदे आहेत, हे अनेक संशोधनांतून दिसून आले आहे. यातील काही फायदे अगदी साहजिक आहेत. तुम्ही कधी दुसऱ्या देशात अडकला असाल, तर आपल्याला काय म्हणायचे आहे हे स्पष्टपणे तुम्ही सांगू शकलात तर काम खूप सोपे होऊ शकते. त्याच प्रमाणे कामानिमित्त तुम्हाला खूप फिरावे लागत असेल तर भाषा आणि संस्कृतीची अनेक बंधने पार करण्याचे काम तुम्ही चुटकीसरशी करू शकता. मात्र असेही काही फायदे आहेत, की ते उघड उघड दिसून येत नाहीत. उदाहरणार्थ, दुसरी भाषा शिकण्यामुळे तुमची एकूण आकलनक्षमता वाढू शकते. तुमच्या व्यक्तित्वातील छुपी कौशल्ये तुम्ही वाढवू शकता आणि अन्य भाषेवरील आपले प्रभूत्वही तुम्ही वाढवू शकता.

एखादी व्यक्ती बहुभाषक असण्यामुळे त्या व्यक्तीला स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. तसेच एकापेक्षा अधिक भाषा बोलता आल्यास जीवनाच्या अन्य क्षेत्रातही ती व्यक्ती एकावेळेस अनेक कामे करण्यात तरबेज होते, असेही काही संशोधनांतून दिसून आले आहे.

आता प्रश्न असा येतो, की कोणती भाषा शिकावीॽ तर हा निव्वळ संधी आणि आवडीनिवडीचा विषय आहे. आपल्याकडे हिंदी चित्रपटांच्या प्रभावामुळे हिंदी तर एकूण व्यवहारातील इंग्रजीच्या प्रस्थामुळे इंग्रजी भाषा अशा दोन भाषा आपसूक शिकण्यात येतात. मात्र या व्यतिरिक्त एखादी भाषा शिकण्यातही आपल्या मातृभाषेचा प्रभाव पडतोच, असेही दिसून येते.

आता याला इंग्रजीच्या जागतिक महत्त्वाचा परिणाम म्हणा किंवा इंग्रजीभाषकातील जन्मजात वर्चस्वाची भावना, परंतु सहसा ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे ते दुसरी भाषा शिकण्यास नाखुश असल्याचे आढळून येते. अमेरिकेतील केवळ 20 टक्के विद्यार्थी परकीय भाषा शिकतात. तर युरोपमधील काही देशांमध्ये ही संख्या 100 टक्क्यांपर्यंत आहे. युरोपमध्ये द्विभाषक लोकांची सरासरी संख्या 92 टक्के आहे, असे प्यू रिसर्च या अमेरिकेतील जगप्रसिद्ध संस्थेची आकडेवारी सांगते. ऑस्ट्रेलियात द्विभाषक लोकांची संख्या केवळ 21 टक्के आहे, मात्र तेथील 2016 मधील जनगणनेत 73 टक्के लोकांनी आपण इंग्रजीभाषक अशल्याचे सांगितले. कॅनडा या देशाचे उदाहरण या निमित्ताने घ्यायला हरकत नाही. तेथे इंग्रजी व फ्रेंच या दोन अधिकृत भाषा आहेत. या दोन भाषांशिवाय आणखी तिसरी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण केवळ 6.2 टक्के आहे. या सर्व देशांमध्ये म्हणूनच विद्यार्थ्यांना मातृभाषेशिवाय दुसरी भाषा शिकण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु दुसरी भाषा शिकणे हे आपल्या मातृभाषेच्या दृष्टीनेही चांगले असते. कारण दुसरी भाषा शिकण्याच्या प्रक्रियेतून आपण स्वतःच्या मातृभाषेतील गुंतागुंती आणि बारकावे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपण दुसरी भाषा आणि आपल्या मातृभाषेत तुलना करतो आणि त्यातील समानता पाहतो. तसेच आपल्या मातृभाषेत शब्दांची निर्मिती कशी होते आणि वाक्य कसे निर्माण होतात, हेही आपण समजू शकतो.

परंतु या सर्वांच्या पलीकडेही दुसरी भाषा शिकण्याचे आर्थिक फायदेही आहेत. अगदी रोकडे फायदे. सध्याच्या जागतिकीकरण झालेल्या काळात बहुभाषक व्यक्तींना कॉर्पोरेट जगतात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. व्यक्तिव्यक्तिंमधले नाते निर्माण करण्यासाठी व आर्थिक यश मिळण्यासाठी विविध भाषांमधून संवाद साधण्याची कला अपरिहार्य आहे, असे आंतरराष्ट्रीय व्यापार समुदायात मानले जाते. म्हणूनच गुगल व मायक्रोसॉफ्टसारख्या संस्थांमध्ये बहुभाषक भारतीयांना मानाचे स्थान मिळत आहे.

कोणतीही भाषा आणि तो बोलणारा समाज यांचे संबंध अत्यंत निकटचे असतात. त्यामुळे कुठल्याही समाजात राहण्याची वेळ आली तिथली भाषा अवगत असणे फार आवश्यक ठरते. एका समाजाने दुसऱ्या समाजाची भाषा शिकणे ही आजच्या काळाची गरजच आहे. भारतासारख्या अनेक भाषा असलेल्या देशात तर एकमेकांच्या भाषा शिकणे खूप गरजेचे आहे. त्यातून आपापसातले गैरसमज दूर होऊन आपण एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकू. आपल्याकडे आंतर भारतीसारख्या संस्था एकमेकांना विविध प्रांतांतील भाषा शिकण्याचे कार्य करतात. सरकारी पातळीवरही म्हैसूर येथील भारतीय भाषा संस्थानासारख्या संस्थेत भारतातल्या हिंदी आणि इंग्रजी सोडून इतर सर्व भारतीय भाषा शिकवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यांचा लाभ घ्यायला हरकत नाही आणि राजकीय नेत्यांच्या पावित्र्यांकडे केवळ राजकीय खेळीच म्हणून पाहायला हरकत नाही. त्यात वाहावून जायला नको.

Leave a Comment