ट्रम्पना भारत एवढा का डाचतोय?


अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाबाबत आता जवळपास सर्व लोकांना माहीत झाले आहे, मात्र अमेरिकेने भारताविरुद्धही पवित्रा घेतला आहे, याची जाण फार थोड्या जणांना आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत डाचतोय, मात्र त्यांचा भारतावर एवढा डोळा का, हेही जाणण्यासारखे आहे. हार्ले डेविडसन ही जगातील आलिशान दुचाकी बनविणारी कंपनी. या कंपनीच्या दुचाकींवर भारताने लादलेल्या शुल्कामुळे सर्वात पहिल्यांदा ट्रम्प यांचे माथे ठणकले. भारत हार्ले डेविडसनवर खूपच शुल्क लावत असल्याची तक्रार ट्रम्प यांनी केली. हे अगदी ‘अस्वीकार्य’ असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अर्थात भारताने आधी लावलेल्या 100 टक्के शुल्कात घट करून हे शुल्क ५० टक्क्यांवर आणले. खुद्द ट्रम्प यांनीही हे स्वीकार केले असून त्यांचे उत्तम मित्र’ नरेंद्र मोदी यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली, असे ते म्हणाले आहेत. तरीही आजही त्यांच्या मनात भारताबाबत अनेक शंका आहेत.

सीबीएस न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते, ”आम्ही मूर्ख देश नाही आहोत की इतके वाईट काम करावे. तुम्ही भारताकडे पाहा की ते काय करत आहेत. ते एका मोटारसायकलवर 100 टक्के टॅक्स वसूल करतात. आम्ही त्यांच्याकडून काहीही घेत नाहीत.”

हे शुल्क भारताने शून्य टक्के करावे, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. ”आपण जेव्हा हार्ले डेव्हिडसन तिकडे पाठवतो तेव्हा ते त्यावर १०० टक्के शुल्क वसूल करतात. मात्र ते मोटारसायकल पाठवतात तेव्हा आपण कोणताही कर घेत नाहीत. मी त्यांना (मोदींना) कॉल करून सांगितले, की हे बिल्कुल खपवून घेणार नाही. त्यांनी एकाच कॉलनंतर त्यात घट करून ५० टक्के केली. मी म्हटले की हे आताही खपवून घेतले जाणार नाही. आम्ही यावर काम करत आहोत.”

अमेरिका ही एक बँक असून प्रत्येक जण ही बँक लुटू पाहत आहे. परंतु माझ्या नेतृत्वात अमेरिका असा देश बनत आहे ज्याला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी एकामागोमाग अनेक देशांच्या सवलती काढून घेण्याचा सपाटा लावला आहे.

भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या मालासाठी आतापर्यंत जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरेंसेज किंवी जीएसपी या नावाने सवलती मिळत होत्या. मात्र ही सवलत संपुष्टात आणण्याची घोषणा ट्रम्प यांनी या महिन्याच्या एक तारखेला केली होती. त्यामुळे भारतीय वस्तूंची निर्यात बाधित होण्याची अपेक्षा आहे. जीएसपी अंतर्गत भारताकडून आयात केल्या जाणार्या. सुमारे 400 अब्ज किंमतीच्या वस्तूंवर अमेरिका कोणतेही शुल्क आकारत नव्हती. त्यामुळे भारताला 19 ते 20 कोटींचा फायदा होत होता. मात्र ट्रम्प यांच्या या घोषणेने त्यामुळे वस्तू महाग होतील व अमेरिकी ग्राहकांनाच नुकसान होईल, असे मत अमेरिकेतच व्यक्त करण्यात आले आहे.

जीएसपी नावाची ही सवलत भारताला १९७६ पासून मिळत आहे. मात्र, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या उत्पादनांवर भारत जे शुल्क लावतो त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थात ट्रम्प यांच्या नाराजीला भीक न घालता भारताने आपल्या निर्णयावर कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. काही विकसित देशांकडून विकासशील देशांना देण्यात येणाऱ्या या एकपक्षीय आणि भेदभावरहित सवलती आहेत, असे वाणिज्यी मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेच्या विनंतीनुसार भारताने द्विपक्षीय व्यादपार चर्चेत उपाय सुचवला होता, मात्र अमेरिकेने तो स्वीकार केला नाही, हे दुर्दैवी असल्याचे मत भारताने व्यक्त केले आहे.

खरी गोष्ट अशी आहे, की भारताकडून शुल्कवाढीबरोबर व्यापार आणि व्यवसायात सक्रिय हस्तक्षेप होत असल्याने अमेरिकेचा पारा विशेष चढला आहे. खासकरून काही वैद्यकीय उपकरणांवर भारत सरकारने किमतींची मर्यादा घातल्याने अमेरिकी उत्पादकांना मोठे नुकसान झाले आणि भारतीय कंपन्यांना फायदा झाला. या व्यतिरिक्त, ई-कॉमर्सवरही नियंत्रणे लादण्यात आली आहेत. त्यामुळे वॉलमार्ट आणि अॅमेझॉन अशा कंपन्यांना मोठा फटका बसला. तसेच भारतीय ग्राहकांना आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना लाभ झाला.

मुळात ट्रम्प हे संरक्षणवादी असून अमेरिकी कंपन्यांच्या लाभाचे धोरण ते राबवतात. त्यात त्या-त्या उद्योगांनी लॉबिंग केल्यामुळे ट्रम्प यांना आयतेच कोलित मिळाले आणि त्यांची भारतावर खप्पामर्जी झाली. त्याचाच परिणाम आज भारताला पाहायला मिळाला आहे. चीनसोबतच बहुतेक ट्रम्पना भारताशीही व्यापार युद्ध खेळायचे असावे!

Leave a Comment