ट्रिपल तलाक विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी – प्रकाश जावडेकर


नवी दिल्ली – पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक मंत्रिमंडळाचे वाटप झाल्यानंतर झाली. सरकारच्या विविध योजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. ट्रिपल तलाक विधेयकाला यावेळी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर ६ महिने जम्मू- काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट कालावधीही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

याबाबत माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, ३ जुलै २०१९ पासून जम्मू-काश्मीरमध्ये ६ महिने राष्ट्रपती राजवट वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर आगामी अधिवेशनात ट्रिपल तलाक विधेयक मांडण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाच्या विधेयकालाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ७ हजार शिक्षकांची थेट भर्ती केली जाणार आहे. जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक, २०१९ ला बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याचा लाभ आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. विविध शैक्षणिक संस्थात प्रवेश आणि पदोन्नतीसाठी या आरक्षणाचा लाभ होणार आहे. बैठकीत ५ जुलै रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात एकूण १० प्रमुख विधेयके सादर करण्यात येणार आहेत.

Leave a Comment