काँग्रेसची अधोगती मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच – विखे-पाटील


अहमदनगर – काँग्रेसची अधोगती मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच झाली असून आता या नेत्यांनी बाजूला होऊन नव्यांना संधी द्यायला पाहिजे, आता चिंतन करण्याचा काँग्रेस पक्षाचा विषय सुध्दा संपला असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. संगमनेरात एका खासगी कार्यक्रमानिमित्त विखे-पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी खांडगाव येथील ग्रामस्थांशी विखे पाटलांनी संवाद साधला. यावेळी विखे पाटलांचे निळवंडे धरण कालव्यांच्या कामाबाबत झालेल्या निर्णयाबद्दल ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून आभार मानले. तर केवळ निर्णयच नाही, तर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली असल्याचे विखे यांनी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे निळवंडे कालव्याच्या प्रश्नासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पक्षविरहीत संघर्ष केला. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत झालेले निर्णय महत्वपूर्ण आहेत. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केलेले सहकार्य आणि जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनीही घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हे यश असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

विखे पाटील भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उतर देताना म्हणाले, आता हा मुद्दाच राहिलेला नाही. मी लोकसभा निवडणुकीत जाहीरपणे युतीचा प्रचार केला असल्याने पक्ष प्रवेशाची फक्त औपचारिकता राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. तर मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment