बारामती आणि इंदापूरला करण्यात येणारा अतिरिक्त पाणी पुरवठा बंद


सोलापूर- कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिलेला बारामतीला नीरा देवघर प्रकल्पातून देण्यात येणारे अतिरिक्त पाणी थांबविण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असून पंढरपूरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीकडे जाणारे अतिरिक्त पाणी थांबविल्यामुळे फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

गेल्या दहा वर्षांपासून नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूरला देण्यात येणारे अतिरिक्त पाणी आता बंद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतची अधिकृत घोषणा केली. पंढरपूर सांगोला माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निणर्याचे फटाके फोडून स्वागत केले.

माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, की बारामतीला देण्यात येणारे पाणी माढ्यातील गावांना देण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खासदार निंबाळकर यांनी चर्चा केली. त्यानंतर सरकारला हा प्रस्ताव पाठविला होता. बारामतीला देण्यात येणाऱ्या पाण्याचा करार २०१७ मध्ये संपुष्टात आला आहे. तरीही नीरा डावा कालव्यातून बारामतीला बेकायदा पाणी दिले जात होते. त्यामुळे हे पाणी माढा लोकसभा मतदारसंघाकडे वळवावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्याकडे केली होती.

नीरा डावा कालव्याअंतर्गत लाभक्षेत्र असलेल्या फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्‍यांना कमी पाणी मिळत होते. मात्र, आता हे पाणी या भागात वळविण्यात येणार असल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

Leave a Comment