सर्व मंत्र्यांनी कार्यालयात वेळेत हजर रहावे – पंतप्रधानांचे निर्देश


नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करुन दुसऱ्यांदा सत्ता काबीज केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. पंतप्रधानांनी या बैठकीत आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व कामे ही आपल्या निवासस्थानातून न करण्याचा सल्ला देत कोणताही दौरा संसदेच्या अधिवेशनादरम्यान न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या कार्यशैलीचे उदाहरण दिले. आपण जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होतो त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबर वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. दरम्यान, यावेळी आपल्या मंत्र्यांना निवडून आलेल्या खासदारांच्या भेटी घेण्यासही पंतप्रधानांनी सांगितले. तसेच पुढील पाच वर्षांचा अजेंडा तयार करून कामाची सुरूवात करावी आणि पुढील 100 दिवसांमध्ये याचा प्रभाव दिसला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Leave a Comment