यामुळे अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट


मुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. अमोल कोल्हे सकाळी 11.30 सुमारास ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. राज ठाकरे यांची अमोल कोल्हे यांनी भेट का घेतली याबाबत उत्सुकता होती. त्याचे कारण अमोल कोल्हे यांनीच सांगितले.

अमोल कोल्हे म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. राज ठाकरे यांच्या सभेचा चांगला इम्पॅक्ट झाला. राज ठाकरे यांचे आभार त्यासाठीच मानण्यासाठी, त्यांची भेट घेतली. अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता. त्यांनी केलेल्या सभांना प्रचंड गर्दी झाली. पण भाजपच्या बाजूने निकाल लागला. पणअमोल कोल्हे यांनी शिरुरमध्ये शिवसेनेचे दिग्गज उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयात राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचा परिणाम दिसून आला, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी पुण्यातील खडकवासला येथे प्रचारसभा घेतली होती. जरी बारामती लोकसभा मतदारसंघात हे सभास्थळ येत असले, तरी त्याचा परिणाम शिरुर, मावळ, बारामती आणि पुणे परिसरात अपेक्षित होता. राज ठाकरे यांच्या सभेचा फायदा शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांना झाला. त्यांनी विजय मिळवला.

डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत, तर राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत. दोघांचेही पक्ष एक नसले तरी ‘मराठी’च्या मुद्द्यावर दोघेजण समान मुद्द्यावर एकत्र येणारे नेते आहेत. शिवाय, दोघांनाही महाराष्ट्रात आपलं स्वतंत्र असे वलय असल्यामुळे या दोघांच्या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Leave a Comment