यामुळे कपिलदेव यांच्या पत्नीची भेट घेणार दीपिका


रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी ’83’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने मिळविलेल्या जगज्जेतेपदावर या चित्रपटाचे कथानक आधारित असून, तत्कालीन विजेत्या संघाच्या कर्णधारपदी असलेल्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका चित्रपटामध्ये रणवीर सिंह साकारणार आहे. तसेच कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका दीपिका साकरणार असून, त्या संदर्भात दीपिका रोमी भाटिया यांची लवकरच भेट घेणार असल्याचे समजते. मेघना गुलझार यांच्या ‘छपाक’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आता दीपिकाने आपले लक्ष ’83’वर केंद्रित केले आहे. ‘छपाक’ या चित्रपटामध्ये दीपिकाने अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल हिची भूमिका साकारली आहे. दीपिका या चित्रपटाची निर्मातीही आहे.

रणवीरने कपिलदेव यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या दृष्टीने कपिलदेव यांच्यासोबत काही काळ व्यतीत केला होता. या भेटीगाठींच्या दरम्यान कपिलदेव यांचे व्यक्तिमत्व, त्यांना असलेली क्रिकेटच्या खेळाची समज, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी आखलेले डावपेच असे सर्व बारकावे या भेटींमधून आपल्याला समजून घेता आले असल्याचे रणवीर म्हणतो. तसेच प्रत्यक्ष खेळातील बारकावे देखील रणवीर सध्या खुद्द कपिलदेव यांच्या देखरेखीखाली आत्मसात करीत असून, त्यामुळे कपिलदेव यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावीपणे पडद्यावर उतरू शकेल अशी खात्री रणवीरला वाटते.

रणवीर प्रमाणेच मोठ्या पडद्यावरील कपिलदेव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका दीपिका पदुकोन साकरणार असून, दीपिका देखील रोमी यांच्याबरोबर काही वेळ व्यतीत करणार आहे. रोमी यांचे व्यक्तिमत्व, कपिलदेव यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे स्थान, आणि क्रिकेटच्या खेळाबद्दल, व कपिलदेव यांच्या कारकिर्दीबद्दल रोमी यांची मते जाणून घेण्याच्या दृष्टीने या भेटीगाठी विशेष महत्वाच्या ठरणार असल्याचे दीपिका म्हणते. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोन हेही कपिलदेव यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू (बॅडमिंटनपटू ) असल्याने दीपिकाचे माता-पिता यांचे कपिलदेव व त्यांच्या परिवाराशी फार जुन्या काळापासून स्नेहसंबंध आहेत. त्यामुळे दीपिकाचा, कपिलदेव आणि रोमी यांच्याशी जुना परिचय आहे.

रोमी भाटिया या कधीही फारशा प्रसिद्धीच्या झोतामध्ये नसल्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारशी माहिती सर्वश्रुत नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने रोमी यांना जवळून ओळखण्याची संधी आपल्याला मिळणार असल्याचे समाधान आपल्याला असल्याचे दिपिका म्हणते. तसेच दीपिका आणि रणवीर या चित्रपटामध्ये साकारत असलेल्या भूमिका आणि एकंदर चित्रपट पाहून कपिलदेव आणि रोमी यांना आनंद आणि समाधान मिळेल अशी आशाही दीपिकाने व्यक्त केली आहे. दीपिका आणि रणवीर यांनी या पूर्वी तीन चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका केल्या असून, ‘गोलियोंकी रासलीला – रामलीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ हे तीनही चित्रपट यशस्वी ठरले होते.

Leave a Comment