आदित्य ठाकरेंचा दिशा पटनीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल


सध्या सोशल मीडियावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी यांचा एकत्रित फोटो व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरे आणि दिशा पटनी अलिशान रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. दिशा आणि आदित्य ठाकरे डिनरला गेले होते, अशी चर्चा आहे.

कधी आपल्या हटके लूकमुळे, कधी कपड्यांमुळे, तर कधी अभिनेता टायगर श्रॉफमुळे दिशा पटनी नेहमीच चर्चेत असते. दिशा तिचे फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्याबद्दल त्यावरुन सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. शिवाय, तिची अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या कथित अफेअरबाबत सुद्धा चर्चा होत असते. पण आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिशा पटनी डिनरला गेल्याची दिसली. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं.


खरंतर दिशा पटनीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा केवळ ‘गॉसिप्स’च राहिली. आता आदित्य ठाकरेंसोबत डिनरला गेल्याने दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सध्या राजकारणात आदित्य ठाकरे अधिक सक्रीय झाले आहेत. त्यांनी युवासेनेचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे सुरु केले आहेत. आदित्य ठाकरे शिवसेनेच्या दैनंदिन कामात, निर्णय प्रक्रियेत सहभागी होत असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली. विशेषत: मुंबईच्या विकासासंबंधी ते अधिक जागृत असतात.

मात्र आता सोशल मीडियावर आदित्य ठाकरे आणि दिशा पटनी यांचा फोटो व्हायरल झाल्याने, नव्या चर्चेला उधाण आले आहे. एरव्ही राजकीय गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या आदित्य ठाकरे यांचेही नाव आता दिशासोबत जोडले जात असल्याने वेगळ्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला, वाचायला मिळत आहेत.

Leave a Comment