कठुआ बलात्कार प्रकरणातील तिघांना जन्मठेप; एकाची निर्दोष मुक्तता


पठाणकोट : सोमवारी न्यायालयाने संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात सातपैकी सहा आरोपींना दोषी ठरवले. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे २०१८ मध्ये बकरवाल समाजातील आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आज पठाणकोट विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने यावेळी सरपंच सांजी राम, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, परवेश कुमार, विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया व सुरेंदर वर्मा आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज या सहा आरोपींना दोषी ठरवले. तर सांजी रामचा मुलगा विशाल जंगोत्रा याची निर्दोष सुटका करण्यात आली. आता न्यायालयाने यातील तीन आरोपींना जन्मठेप तर दोघांना पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पीडित मुलीचे गेल्यावर्षी १० जानेवारीला अपहरण करण्यात आले होते. यानंतर गावातील मंदिरात तिला बेशुद्ध करून डांबून ठेवण्यात आले होते. नराधम आरोपींनी या काळात तिच्यावर अत्याचार केल्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात संतापाची मोठी लाट उसळली होती. देशभर निषेध मोर्चे काढण्यात आले होते. परिसरातून मुसलमानांना हुसकावून लावण्यासाठी हे कृत्य या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सांजी राम याने केल्याचेही तपासात समोर आले होते. बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या सांजी राम हा विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असे. या अमानवी कृत्यासाठी त्यानेच इतरांना भडकावले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या १५ पानी आरोपपत्रात या प्रकरणाने जातीय तेढ निर्माण झाल्याचे म्हटले होते. जम्मूमध्ये मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने करण्यात आली होती.

Leave a Comment