असे आहे केरळचे सुप्रसिद्ध गुरुवायूर मंदिर


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केरळ राज्याच्या दौऱ्यावर असताना केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर येथे असलेल्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये जाऊन दर्शनाचा लाभ घेतला. हे गुरुवायूर मंदिर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे मंदिर असून, येथे दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. या मंदिरामध्ये भगवान गुरुवायुरप्पन यांची प्रतिष्ठापना केली गेली असून, भगवान गुरुवायुरप्पन, श्रीकृष्णाचे बालरूप म्हणून पूजले जातात. गुरुवायूर मंदिराला ‘भूलोका वैकुंठम्’ या नावाने ही ओळखले जात असून, भगवान विष्णूंचा वास असलेले धरतीवरील वैकुंठ असा या नावाचा अर्थ आहे.

भगवान श्रीकृष्णांचे अधिपत्य असलेली ‘दक्षिणेची द्वारका’ असा ही या मंदिराचा लौकिक आहे. येथे विराजमान असलेले गुरुवायुरप्पन श्रीकृष्णाच्या बालरूपाचे प्रतीक आहेत. या मंदिरामध्ये हिंदूंशिवाय इतर धर्मीय लोकांना दर्शनाची अनुमती नाही. पौराणिक कथांच्या अनुसार हे मंदिर गुरु बृहस्पती आणि वायू या देवतांशी संबंधित आहे. या कथेच्या अनुसार, एकदा बृहस्पती देवांना श्री कृष्णाची प्रतिमा पाण्यावर तरंगताना आढळली. त्यानंतर वायू देवतेच्या सहाय्याने ही प्रतिमा बृहस्पतींनी कलियुगामध्ये मानवकल्याणासाठी गुरुवायूर येथील मंदिरामध्ये स्थापन केल्याची आख्यायिका आहे. आणखी एका आख्यायिकेच्या अनुसार जेव्हा द्वारका नष्ट होत होती, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या मंदिरातील बालरूप प्रतिमा काढून घेऊन ती केरळ येथील मंदिरामध्ये स्थापन करण्यास साधूंना सांगितले. हीच प्रतिमा गुरुवायुरप्पनच्या रूपामध्ये आज पहावयास मिळत असल्याचे म्हटले जाते.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळामध्ये या मंदिरामध्येही इतर मंदिरांच्याप्रमाणे हरिजनांच्या प्रवेश निषिद्ध मानला जात असे. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधीजींनी हरिजनांना समाजामध्ये स्वीकारले जाण्यासाठी सुरु केलेल्या चळवळीच्या परिणामस्वरूप इतर मंदिरांच्या प्रमाणे गुरुवायूर मंदिरामध्येही हरिजनांना प्रवेश देण्याची व पूजनाची अनुमती देण्यात आली. या मंदिरामध्ये प्रवेश करताना सर्व भाविकांनी पारंपारिक पोशाख करणे आवश्यक असते. अनेक भाविक येथे दर्शनाला आल्यानंतर रुपये (नाणी), फळे, किंवा मसाल्यांच्या पदार्थांनी स्वतःची ‘तुला’ करवून घेऊन या वस्तू मंदिरामध्ये अर्पण करीत असतात.

Leave a Comment