पतीच्या आठवणीत या महिलेने लावली तब्बल ७३ हजार झाडे!


आपल्यापैकी किती जण निसर्ग प्रेमी आहेत. पण हा निसर्ग टिकविण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे आणि ते आपले पहिले कर्तव्य आहे. पण आम्ही आज तुम्हाला एक महिलेबाबत सांगणार आहोत, जिने आपल्या पतीच्या आठवणीत आतापर्यंत चक्क ७३ हजार झाडे लावली आहेत. या ६८ वर्षीय महिलेचे नाव जेनेट यज्ञेश्वरन असे असून त्या बंगळुरूच्या रहिवासी आहेत. अनेक खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे.

२००६ पासून आतार्यंत जेनेट यांनी ७३ हजार झाडे लावली आहेत आणि त्या आगामी वर्षांमध्ये आणखी झाडे लावणार आहेत. त्यांच्या पतीच्या आठवणीत त्यांनी लावलेले पहिले झाड आता खूपच मोठे झाले आहे. त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ७३ हजार झाडांचा टप्पा पार केला.

बंगळुरू आणि कर्नाटकच्या अनेक भागात जेनेट यांनी झाडे लावली आहेत. जेनेट यांचे यावर्षाच्या शेवटपर्यंत ७५ हजार झाडे लावण्याचे लक्ष्य आहे. एका वृत्तपत्राला जेनेट यांनी माहिती दिली की, त्यांनी लावलेले झाडे मोठे होताना बघताना त्यांना फार गर्व वाटतो. जेनेट यांच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी झाडे लावण्याच्या अभियानाला सुरूवात केली. यावेळी बंगळुरूच्या अनेक भागांमध्ये झाडांची कत्तल सुरू होती. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना झाडे लावण्याचे अभियान सुरू करण्याचा सल्ला दिला होता.

पुढे त्या सांगतात की, मला मी काहीतरी वेगळे करू शकते, असे वाटल्यामुळे पतीच्या आठवणीत मी रोजानेट यज्ञेश्वरन चॅरिटेबल ट्रस्टची सुरूवात केली आणि आजूबाजूला झाडे लावणे सुरू केले. सुरूवातीला जेनेट यांनी आजूबाजूच्या लोकांनाही या अभियानात सहभागी होण्यासाठी विचारणा केली होती, पण काहीच लोक यात सहभागी झाल्यामुळे एकटीने या अभियानाला त्यांनी पुढे नेले आणि काही वर्षातच त्यांनी कर्नाटकसह तामिळनाडूमध्येही झाडे लावणे सुरू केले.

Leave a Comment