100व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत देशात राहणार भाजपची सत्ता


आगरताळाः यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयानंतर पक्षातील नेत्यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. शुक्रवारी पार्टीच्या एका कार्यक्रमात भाजपचे महासचिव राम माधव यांनी मोठा दावा केला आहे. देशाच्या 100व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत अर्थात 2047पर्यंत देशातील सत्ता भाजप काबीज करेल. तसेच काँग्रेसचा सर्वाधिक काळ उपभोगलेल्याचा रेकॉर्ड भाजप तोडेल, असेही ते म्हणाले आहेत.

शुक्रवारी त्रिपुरामध्ये भाजपचे महासचिव राम माधव म्हणाले, कोणता पक्ष जर सर्वाधिक काळ सत्तेत राहिला असेल तर तो काँग्रेस आहे. 1950 ते 1977पर्यंत देशात काँग्रेसने सत्ता गाजवली. तुम्हाला मी विश्वासाने सांगू शकतो की, हा रेकॉर्ड मोदी तोडतील. भारत 2047ला स्वातंत्र्याचे 100वे वर्षं साजरा करेल, देशात तोपर्यंत भाजपची सत्ता राहील, असेही राम माधव म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने आगरताळा, त्रिपुरातील दोन्ही जागा जिंकल्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.

त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव, राष्ट्रीय महासचिव राम माधवसह इतर नेतेही या कार्यक्रमात सहभागी होते. भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजय राहटकर यावेळी म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीतील हा विजय म्हणजे पूर्णविराम नाही. ही तर सुरुवात आहे, अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.

Leave a Comment