खिशामध्ये सलमानचे फोटो बाळगत असे हा बॉलीवूडचा ‘हीरो’


सुपरस्टार सलमान खान अभिनित ‘भारत’ हा चित्रपट नुकताच दर्शकांच्या भेटीला आला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटामध्ये सलमानच्या पित्याची भूमिका अभिनेते जॅकी श्रॉफ यंनी साकारली असून, बॉलीवूडमध्ये ‘हीरो’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले ‘हीरो’ जॅकी, वास्तवातही सलमानला आपल्या मुलाप्रमाणेच मानतात. आपल्या आयुष्यामध्ये सलमानचे विशेष स्थान असल्याचे जॅकी श्रॉफ यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

सलमान आपल्याला आपल्या मुलाप्रमाणे प्रिय असून, सलमान चित्रसृष्टीत अभिनेता म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी सलमानची छायाचित्रे अनेक निर्मात्यांना दाखवून सलमानला चित्रपटामध्ये भूमिका मिळवून देण्यासाठी जॅकी सलमानची शिफारस करत असत. १९८८ साली जॅकीचा ‘फलक’ नामक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी सलमानची काही छायाचित्रे स्वतः टिपली आणि ही छायाचित्रे स्वतःजवळ ठेऊन ते निर्मात्यांना दाखवत असत. सलमान एक ना एक दिवस प्रसिद्ध अभिनेता बनेल याची खात्री आपल्याला आधीपासूनच असल्याचेही जॅकी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

सलमानला चित्रपटांमध्ये भूमिका मिळाव्यात या करीता सलमानची शिफारस करण्याच्या उद्देशाने जॅकी सतत अनेक निर्मात्यांना फोनही करत असत. आजच्या काळामध्ये उदंड यश मिळविलेल्या सलमान सारख्या दिग्गज अभिनेत्याच्या पित्याची भूमिका साकारायची संधी मिळाल्याने आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याचे जॅकी म्हणतात. चित्रपट विशेषज्ञांच्या मते सलमानचा ‘भारत’ यंदाच्या वर्षातला सर्वात मोठे ‘ओपनिंग’ मिळणारा चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटाला दर्शकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून, सलमानसह या चित्रपटामध्ये कतरिना कैफ, तब्बू, नोरा फतेही आणि दिशा पटनी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Leave a Comment