
नवी दिल्ली – भोपाळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकी दरम्यान वारंवार भाजपला अडचणीत आणणाऱ्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपण आगामी काळात पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. आपला कारभार पक्षशिस्तीला अनुसरुनच असेल असे साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञा यांना भाजप नेतृत्वाने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त ठरवल्यानंतर कारणेदाखवा नोटीस बजावली होती.
यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार – साध्वी प्रज्ञा
साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर मोठया मताधिक्याने विजय मिळवला. पक्षाची मी शिस्तबद्ध सदस्य असून पक्ष संघटनेत शिस्त असली पाहिजे असे मत साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्त केले. संधी मिळेल तेव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आवडेल असे साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी नथुराम गोडसेची स्तुती केल्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांची कानउघडणी केली होती. साध्वी प्रज्ञा ज्या गोडसेंबद्दल म्हणाल्या त्याबद्दल मी त्यांना कधीही माफ करणार नाही असे पंतप्रधान मोदी जाहीर सभेत म्हणाले होते.
