
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विटरच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. शिवछत्रपती हे क्षत्रिय वर्णाचे नसून ते शुद्र वर्णाच्या कुणबी समाजात जन्माला आले असल्याचे, तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. ज्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलच धारेवर धरल्यानंतर यावर आता खुद्द पायलने स्पष्टीकरण दिले आहे.
शिवछत्रपतींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पायल रोहतगीची पलटी
यासंबंधी मी एका पुस्तकात वाचले होते. केवळ यावर एकाच ठिकाणी याबद्दल वाचून विश्वास ठेवणे चुकीचे असल्याने हे खरे आहे का? मी ही पोस्ट हे जाणून घेण्यासाठी शेअर केली होती. मात्र मला याचे उत्तर देण्याऐवजी अनेकांच्या शिव्याच ऐकाव्या लागल्या. आजही आपल्या देशात कोणी शुद्र असेल तर त्याच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले जाते, हे खूप वाईट असल्याचे सांगत इंग्रज आणि मुघल गेले पण जातीच्या नावाखाली देशाचे तुकडे करून गेल्याचे तिने म्हटले आहे.
आजही देशात एवढ्या प्रमाणात जातीयवाद आहे आणि सध्या सोशल मीडियावर मला अनेकांच्या टीकांचा सामना करावा लागत आहे. ज्यातील बहुतेक लोक हे मराठीचे असल्याचे पायलने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मी शिवाजी महाराजांची जात सांगितली नव्हती तर मी केवळ एक प्रश्न केला होता. त्यांची जात ठरवायला मी कोण? असा सवाल करत पायलने याविषयावर स्पष्टीकरण दिले आहे.
