एका वर्षाखालील मुलांना साई मंदिरात नेल्यास करावी लागणार नोंदणी


नगर : नुकतीच एक सहा महिन्यांची मुलगी शिर्डीतील साई मंदिरातील गुरुस्थान येथे दानपेटीजवळ सापडली होती. साई संस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज यावेळी तपासले असता तिला तिची आईच बेवारस सोडून गेल्याचे उघडकीस आले होते. साई संस्थानाने या घटनेचा बोध घेत यापुढे मंदिरात प्रवेशावेळी पालकांना रजिस्टरमध्ये एका वर्षाखालील बालकांची नोंदणी करावी लागणार आहे. हा निर्णय आज 1 जूनपासून लागू करण्यात आला आहे.

शुक्रवारी 31 मे सकाळी 6 वाजल्याच्या दरम्यान एक महिला शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आली होती. एक लहान मुलगी तिच्या हातात होती. मुलीसह साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 मधून या महिलेने प्रवेश केला. ही महिला प्रवेश केल्यानंतर मुलीसह गुरुस्थान मंदिराच्या दानपेटीजवळ पोहोचली. त्या महिलेने गर्दीचा फायदा घेत मुलीला तिथेच सोडले आणि गेट क्रमांक 3 वरुन ती बाहेर पडली. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला.

काही भाविकांनी यानंतर या चिमुकल्या मुलीला साईबाबा संस्थानाकडे दिल्यानंतर या चिमुकलीची संस्थानाने रुग्णालयात प्राथमिक तपासणी करुन तिची रवानगी नगरच्या चाईल्ड लाईन संस्थेत करण्यात आली आहे. पण शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment