भाजपच्या वाटेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह?


मुंबई – भाजपमध्ये काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह हे प्रवेश करणार का, या चर्चेला आता पुन्हा उधाण आले आहे. कारण नुकतीच कृपाशंकर सिंह यांची भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘सदिच्छा भेट’ घेतली. कृपाशंकर सिंह आधीही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चर्चंना भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीमुळे पुन्हा उधाण आले आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात कृपाशंकर सिंह हे मंत्री होते.

भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते आणि आमदार असल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची वाढलेली उघड जवळीक सर्वश्रुत आहे. त्यातच गिरीश महाजन यांची काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही भेट घेतली आणि आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कृपाशंकर सिंह यांची भेट घेतल्याने काँग्रेसमधील आणखी एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच वर्षी गणेशोत्सवात काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. कृपाशंकर सिंह यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षी’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

Leave a Comment