
निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी याचे चित्रपट अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असतात. सध्या आपल्या आगामी सुर्यवंशी या चित्रपटाच्या चित्रिकरणात रोहित व्यस्त आहे. याचदरम्यान त्याने आपल्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात झळकणार ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’?
यासंदर्भातील वृत्त ‘डेक्कन क्रोनिकल’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशन’मध्ये रोहित शेट्टीने गेल्याच आठड्यात त्याच्या नव्या चित्रपटाच्या नावाची नोंदणी केली असल्याचे सांगितले आहे. ‘आया पोलिस’ असे या चित्रपटाचे नाव आहे. तसेच रोहित शेट्टीने हे नाव त्याच्या ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आला रे आला’ या गाण्यातील काही शब्दांवरुन ठेवले असल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटाबाबत कोणताही खुलासा अद्याप रोहित शेट्टीने केलेले नाही. कोणते कलाकार चित्रपटात दिसणार, चित्रपटाची कथा काय असणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडू लागले आहेत. तसेच ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’ यांना या चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार अशा देखील चर्चा सुरु आहेत.
रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने याआधी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावला होता. त्यानंतर आता आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणामध्ये रोहित शेट्टी व्यस्त आहे. अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
