
अभिनेता आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ ‘सुरमा’ चित्रपटातील उत्तम अभिनयानंतर लवकरच आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. दिलजीतच्या अपोझिट या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम झळकणार असून पहिल्यांदाच या निमित्ताने ही जोडी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
पहिल्यांदाच जमणार यामी गौतम आणि दिलजीत दोसांझची जोडी
या चित्रपटातूनच दिग्दर्शक अझीझ मीर्झा यांचा मुलगा हारुण दिग्दर्शनीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. याआधीही अझीझ मीर्झा यांच्या ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘यस बॉस’ आणि ‘पहेली’सारख्या चित्रपटांसाठी हारुणने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटाची कथा अर्शद आणि विभा सिंग यांनी लिहिली आहे तर रमेश तौरानी यांची निर्मिती असणार आहे.
या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक निश्चित झाले नाही. दरम्यान लवकरच ‘गूड न्यूज’ चित्रपटातूनही दिलजीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘बाला’ या चित्रपटात यामी आयुष्मान आणि भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
