भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे राज ठाकरेंच्या भेटीला


धुळे – राज्यातील विविध राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी भेट घेतली. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गोटे आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची मानली जात असून, नेमकी काय चर्चा या भेटीत झाली, याची उत्सुकता वाढली आहे.

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अनिल गोटे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात या निवडणुकीत प्रचार केला होता. वेळोवेळी आपल्या प्रचारातून भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या अनिल गोटे यांनी टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लोकसभा निवडणुकीत विविध ठिकाणी सभा घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थात कृष्णकुंज येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांची काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर काही वेळातच भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे देखील कृष्णकुंजवर पोहोचले. अनिल गोटे आणि राज ठाकरे यांच्यात यावेळी अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment