धोनी योग्यवेळी घेईल निवृत्तीचा निर्णय – शेन वॉर्न


कार्डिफ – अवघे काही तास विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यासाठी शिल्लक राहिलेले असताना, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी फॉर्मात परतला आहे. धोनीने बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. धोनी काही महिन्यांपूर्वी फॉर्मात नसताना, निवृत्तीचा दबाव त्याच्यावर वाढला होता. धोनीने निवृत्ती स्विकारावी असाही सल्ला अनेक माजी खेळाडूंनी दिला होता. पण निवृत्तीचा निर्णय हा धोनीच योग्यवेळी घेईल. यासाठी त्याला सल्ल्याची गरज नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न मांडले आहे.

भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान महेंद्रसिंह धोनीने दिले आहे. काही लोकांकडून मध्यंतरी त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव टाकण्यात येत होता, ही गोष्टच मला पटली नाही. निवृत्ती कधी स्विकारायची याबाबत धोनीच निर्णय घेऊ शकतो आणि ती वेळ त्याला नक्की माहिती असेल. मग ती विश्वचषक संपल्यानंतर असो किंवा स्पर्धेनंतर ५ वर्षांनी असो, आपल्या निवृत्तीची वेळ ठरवण्याचा अधिकार धोनीला आहे.

धोनीचे विश्वचषक स्पर्धेआधी फॉर्मात येणे भारतीय संघासाठी महत्वाचे मानले जात होते. धोनी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात अपयशी ठरला होता. पण धोनीने बांगलादेशविरुद्ध सामन्यात मधल्या फळीत शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.

Leave a Comment