शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून घेणार शपथ


मुंबई – ३० मे रोजी म्हणजे गुरुवारी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व खासदार यावेळी मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. श्रीकांत शिंदे यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर डोंबिवलीत प्रथमच मतदारांची भेट घेतली. त्यांनी यावेळी बोलताना शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती दिली.

मराठी अस्मितेवर चालणारी शिवसेना ही संघटना असून नेहमीच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेने लढा दिला असल्याचे यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, शिवसेनेच्या सर्व खासदारांनी गेल्या दहा वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अशा अभिमानास्पद भाषेतूनच आम्ही खासदारकीची शपथ घेणार आहोत.

दरम्यान #मराठीतशपथ अशा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होत असून महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी अशी मागणी होत आहे. खासदारांना शपथ घेताना भाषेचा पर्याय असतो. खासदारांना आपल्या मातृभाषेत शपथ घेण्याचा पर्याय दिला जातो. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या शपथविधीत कोणत्या भाषेत शपथ घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Leave a Comment