रणवीरची टीम विश्वचषकाच्या तयारीसाठी लंडनला रवाना


भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार पुन्हा रूपेरी पडद्यावर ‘८३’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच पुढच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाली आहे.

या टीमचा उत्साह मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहायला मिळाला. क्रिकेट टीमचे काळ्या रंगाचे कोट अभिनेता रणवीर सिंह आणि त्याच्यासोबत इतर कलाकारांनी घातले होते. त्यांना घेऊन येणाऱ्या बसवर त्या वर्ल्डकपच्या छायाचित्रांचा संग्रहदेखील लावण्यात आला होता.

या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंह साकारत आहे. त्यांच्या भूमिकेसाठी त्याने कपिल देव यांच्या घरी १० दिवस राहुन त्यांच्याकडुन प्रशिक्षण घेतले. सर्वच कलाकारांनी या चित्रपटासाठी मेहनत घेतल्याचे त्याने माध्यमाशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर आता होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याने भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘८३’च्या दिग्दर्शनाची धुरा ‘चक दे इंडिया’चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच सांभाळली आहे. उत्तम कथा आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २०२० मध्ये १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याची रणवीर आणि कपिल देव यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment