
जयपूर – राजस्थानच्या शालेय पाठ्यपुस्तकात विनायक दामोदर सावरकर हे पोर्तुगालचे पुत्र होते, असा मजकूर छापण्यात आला असून राजस्थानमध्ये यावरून चांगलेच वादंग पेटले आहे. भाजपनेही काँग्रेस सरकारला या प्रकारानंतर धारेवर धरले आहे.
राजस्थानातील शालेय पाठ्यपुस्तकात सावरकरांचा ‘पोर्तुगालचे पुत्र’ असा उल्लेख
विनायक दामोरदर सावरकर हे पोर्तुगालचे पुत्र असल्याचा उल्लेख राजस्थान शिक्षण विभागाच्या इयत्ता १० वीच्या सामाजिक विज्ञान या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. राजस्थानच्या माजी शिक्षणमंत्र्यांनी यावरून राज्य सरकारला जाब विचारला असून या प्रकाराचा विरोध केला आहे.
हा प्रकार हेतुपरस्सर केला नसून ही पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून चूक झाल्याचे राज्य सरकारने सांगितले. काँग्रेसवर भाजपने लावलेले आरोपही राज्य सरकारने फेटाळून लावले आहेत. तर काँग्रेसवर माजी शिक्षणमंत्री व भाजप नेते वासुदेव देवनानी यांनी कठोर टीका केली असून काँग्रेस नेत्यांनी इंदिरा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. इंदिरा गांधी यांनी सावरकरांना देशभक्त आणि महान क्रांतीकारक संबोधल्याचे त्यांनी सांगितले.
