११ भारतीयांच्या नावाचा स्विस बँकेकडून खुलासा


बर्न : स्विस बँकांमध्ये खाते असणाऱ्या भारतीयांच्या संबधातील सूचना द्यायची प्रक्रिया स्वित्झर्लंडने वेगवान केली असून एक डझन भारतीयांना मागच्या एका आठवड्यामध्येच याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मार्चपासून आतापर्यंत स्विस बँकांमधील भारतीय ग्राहकांना स्वित्झर्लंड प्राधिकरणाने कमीत कमी २५ नोटीस पाठवल्या आहेत. या खात्यांची माहिती भारत सरकारला देण्याविरोधात अपील करण्याची शेवटची संधी स्वित्झर्लंडच्या प्राधिकरणाने दिली आहे.

स्विस बँकेत खाती असणाऱ्या ग्राहकांची नावे स्वित्झर्लंड गोपनीय ठेवते. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कर चोरी प्रकरणामुळे करार झाल्यामुळे ही अडचण आता राहिली नाही. स्वित्झर्लंड आणि भारत सरकारमध्ये खातेदारांच्या नावांची माहिती देण्याबाबत करार झाला आहे. अशाच प्रकारे इतर देशांनीही स्वित्झर्लंडशी करार केले आहेत.

आपल्या बँकेतील खात्यांबाबत काही माहिती स्वित्झर्लंड सरकारने सार्वजनिक केली आहे. यामध्ये खातेदारांची सुरुवातीच्या नावाचे अक्षर आणि त्यांचा जन्मदिवस आणि वर्ष ही माहिती दिली आहे. फक्त २१ मे रोजी जाहीर झालेल्या यादीमध्ये ११ भारतीयांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

ज्या दोन भारतीयांची नावे पूर्ण सांगण्यात आली आहेत, त्यामध्ये मे १९४९ मध्ये जन्म झालेले कृष्ण भगवान रामचंद आणि सप्टेंबर १९७२ मध्ये जन्मलेले कल्पेश हर्षद किनारीवाला यांच्या नावाचा समावेश आहे. इतर भारतीय नावांची घोषणा करण्यात आली नसली तरी त्यांच्या नावाची अक्षरे सांगण्यात आली आहे.

२४ नोव्हेंबर १९४४ साली जन्मलेले एएसबीके, ९ जुलै १९४४ साली जन्मलेले एबीकेआय, २ नोव्हेंबर १९८३ साली जन्मलेल्या श्रीमती पीएएस, २२ नोव्हेंबर १९७३ साली जन्मलेल्या श्रीमती आरएएस, २७ नोव्हेंबर १९४४ साली जन्मलेले एपीएस, १४ ऑगस्ट १९४९ साली जन्मलेल्या श्रीमती एडीएस, २० मे १९३५ रोजी जन्मलेले एमएलए, २१ फेब्रुवारी १९६८ साली जन्मलेले एनएमए आणि २७ जून १९७३ साली जन्मलेले एमएमए ही नावे आहेत.

आवश्यक कागदपत्र आणि पुराव्यांसह संबंधित ग्राहक किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी ३० दिवसांत अपीलसाठी उपस्थित राहावे, असे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. भारतीय नागरिक रतनसिंह चौधरी यांनाही अशाचप्रकारे ७ मे रोजी नोटीस देण्यात आली होती आणि १० दिवसांच्या आत अपील करायला सांगण्यात आले होते. याचबरोबर कुलदीप सिंह धिंगरा, अनिल भारद्वाज यांनाही अशा पद्धतीने नोटीस पाठवली होती. या नावांमधील काहींच्या नावांचा उल्लेख एचएसबीसी आणि पनामा पेपरच्या यादीत असल्याचेही बोलले जात असल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.

Leave a Comment