मलेशियात वेटर रुपात पोलिसांची रेस्टॉरंटमध्ये पाळत


मुस्लीम धर्मियांसाठी सर्वाधिक पवित्र मानला जाणारा रमझानचा महिना सध्या सुरु आहे आणि त्या महिन्यात बहुतेक मुस्लीम रोजे पाळतात. मलेशियात या दिवसात रोजा न पाळणाऱ्या मुस्लिमांची धरपकड केली जात असल्याचे समजते. यासाठी कायदा नियामक मंडळाने ३४ पोलीस अधिकारी तैनात केले असून ते शहरातील विविध रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकी किंवा वेटर म्हणून गुप्तरूपाने काम करत आहेत. अश्याप्रकारे २०० विविध रेस्टॉरंटवर पोलिसांची पाळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या महिन्यात रोजा पाळणे हे अनेक देशात बंधनकारक आहे. यात सूर्योदय होण्यापूर्वी अन्न ग्रहण केले जाते आणि नंतर रात्री उपास सोडला जातो. मधल्या वेळात पाणी सुद्धा प्यायले जात नाही. मलेशिया सरकारने रोजा पाळणे सर्व नागरिकांसाठी बंधनकारक केले असून हा नियम मोडल्यास ६ महिने तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस गुप्तपणे रेस्टॉरंटमध्ये येऊन पाणी, खाद्यपदार्थ मागविणाऱ्या नागरिकांचे फोटो काढत आहेत. त्यासाठी ते वेटर अथवा स्वयंपाकी बनून ग्राहकांना सर्विस देत आहेत.

जोहारमध्ये १८५ दुकानांना फूड लायसन्स दिले गेले आहे. तेथे येऊन जे कुणी ग्राहक खाद्यपदार्थ अथवा चहा पाणी मागवत आहेत त्यांचे रेकॉर्ड ठेवले जात आहे. हे काम रेस्टॉरंट मालकांवर सोपविले गेले असून त्यांनी सीसीटीव्ही अथवा अन्य मार्गाने पाळत ठेऊन अश्या ग्राहकांची माहिती स्थानिक धर्मपरिषदेला द्यायची आहे.

याविरोधात नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. नागरिकांवर या कारणाने पोलीस पाळत ठेवण्यास मुस्लीम महिला अधिकार समूहाने तीव्र टीका केली असून असल्या कारवाईची सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला पाहिजे अशी मागणी केली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार रमजान मध्ये रोजा पाळणे बंधनकारक आहे. तरीही लोक दिवसा खात पीत असतील तर तो धर्माचा अपमान आहे. त्यामुळे अशी पाळत ठेवणे आवश्यक बनले आहे.

Leave a Comment