मोदींच्या बायोपिकला प्रेक्षकांनी नाकारले


17 व्या लोकसभा निवडणुकीत बहुमत सिद्ध करत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. याचदरम्यान त्यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम मोदी’ हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशीच प्रदर्शित करण्यात आला. त्यांच्या बालपणापासून तर राजकीय प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. पण या चित्रपटाकडे अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.

पहिल्याच दिवशी प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांनी वादात अडकलेला हा चित्रपट तोंडघशी आपटला आहे. या चित्रपटाला मोदी लाट पाहता प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळेल, असे अंदाज व्यक्त केले जात होते. पण चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता नरेंद्र मोदी जरी जिंकले असले, तरी त्यांच्यावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांनी मात्र नाकारले, असेच चित्र सध्या या आकडेवारीवरून पाहायला मिळते.


या चित्रपटाच्या कमाईचे आकडे चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या 2.88 कोटींची, शनिवारी 3.76 कोटी आणि रविवारी 5.12 कोटींची कमाई करत एकूण 11.76 कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय याने नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. आठवड्याअंती आता या चित्रपटाच्या कमाईत किती भर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

Leave a Comment