‘एक चिडिया, अनेक चिडिया’च्या दिग्दर्शिका विजया मुळे यांच्याबद्दल काही


अनेक वर्षांपूर्वीचा, जेव्हा टीव्हीवर अनेक निरनिराळ्या वाहिनींची गर्दी झाली नव्हती तेव्हाचा तो काळ. त्याकाळी केवळ दूरदर्शन अस्तित्वात होते. त्या काळी ‘एक चिडिया, अनेक चिडिया’ अशी शब्दरचना असलेली अॅनिमेशन फिल्म आजही आपल्यापैकी अनेकांच्या स्मरणात असेल. एका पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या चिमण्यांनी प्रयत्नपूर्वक आपली सुटका कशी करून घेतली आणि यासाठी त्यांची एकी कशी कामी आली, ही कथा सांगणारी ही सात मिनिटांची अॅनिमेशन फिल्म होती. बहुतेक सर्व लहान मुलांना या फिल्ममधले गीत आणि संवाद तोंडपाठ असत, इतकी ही फिल्म सर्व बालचमूची आवडती होती. सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मात्या, संशोधिका आणि शिक्षणतज्ञ विजया मुळे यांनी या लोकप्रिय अॅनिमेशन फिल्मचे दिग्दर्शन केले होते.

विजया मुळे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कन्या सुहासिनी मुळे सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत. विजया मुळेंचे आयुष्य कसे होते हे सांगणारे अनेक किस्से सुहासिनी मुळेंच्या आठवणीत आहेत. या आठवणी सुहासिनी मुळे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेसशी’ बोलताना कथन केल्या. विजया मूळच्या मुंबईच्या. वयाच्या विसाव्या वर्षी विवाह झाल्यानंतर त्यांच्या पतींच्या सोबत त्या पटना येथे राहण्यास आल्या. मुंबईमध्ये वाढलेल्या मुलीसाठी पटना सारखे शहर एक वेगळेच रसायन होते. त्यामुळे येथे वेळ कसा घालवावा हा विजयाच्या पुढला मोठा प्रश्न होता. त्यांच्या सुदैवाने, पटना विद्यापीठामध्ये महिलांसाठी काही स्वतंत्र शिक्षण अभ्यासक्रम असल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी पदविका शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतला.

त्याकाळी दर रविवारी रास्त दरांत इंग्रजी चित्रपट अनेक चित्रपटगृहांत दाखविले जात असत. हे चित्रपट पाहण्याची गोडी विजयाला जडली आणि हळू हळू चित्रपटसृष्टी त्यांना आकृष्ट करून घेऊ लागली. १९४६ साली पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांना लीड्स विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळाली. येथे आल्यावर त्यांना चित्रपटांच्या सोबत नाट्यकलेचा परिचयही जवळून होऊ लागला. विद्यापीठातील ‘फिल्म सोसायटी’च्या त्या सदस्य बनल्या. चित्रपट पाहण्याची आवड त्यांना होतीच, पण त्याचबरोबर याच क्षेत्रामध्ये पुढे काम करण्याची त्यांची इच्छा होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्थानिक फिल्म सोसायटीज् सोबत काम करणे विजयाने सुरु केले.
१९५० साली भारत सरकारने विजयाची नेमणूक शिक्षण अधिकारी म्हणून केली, पण तरीही चित्रसृष्टीमध्ये विजयाची रुची कायम राहिली. १९५९ साली विजया मुळे यांनी दिल्ली फिल्म सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर इतर आठ फिल्म सोसायटींचे निर्माण होऊन अखेरीस सर्व फिल्म सोसायटी एकत्र आल्या आणि ‘फिल्म सोसायटीज् ऑफ इंडियाची’ स्थापना झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे या संघटनेचे अध्यक्ष असून, विजया या संघटनेच्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. १९७४ साली विजया मुळे यांनी ‘एक चिडिया, अनेक चिडिया’ या अॅनिमेशन फिल्मचे दिग्दर्शन केले. आज ही फिल्म बनविली गेल्याला चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ जरी उलटून गेला असला, तरी याच्या आठवणी मात्र अनेकांच्या मनामध्ये आजही ताज्या असतील हे नक्की.

Leave a Comment