मोदी सरकारमध्ये अरुण जेटलींच्या जागी हे असू शकतात नवे अर्थमंत्री


नवी दिल्ली – भाजप प्रणित एनडीए सरकारला लोकसभा निवडणूकीत बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाची फेररचना करावी लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या जागी नव्या मंत्रिमंडळात सध्या रेल्वेमंत्री असलेले पियूष गोयल यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी प्रकृति अस्वास्थामुळे अरुण जेटली हे अमेरिकेत उपचारासाठी गेले असताना प्रभारी अर्थमंत्री म्हणून पियूष गोयल यांनी जबाबदारी सांभाळली होती. जेटलींनी प्रकृतीच्या कारणामुळे केंद्रीय अर्थमंत्री पद स्विकारले नाही तर पदाचा अनुभव असलेला व्यक्ती म्हणून गोयल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण अर्थव्यवस्था मंदावली असताना सरकारची चिंता वाढली आहे. मोदी सरकार अशा स्थितीत नवा चेहरा देण्याबाबत विचार करणार नाही. गोयल यांनी यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना गाझियापूरमधून (पूर्व) पराभव स्विकारावा लागल्यामुळे प्रसाद यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये सध्याचे कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दूरसंचार मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. दूरसंचार मंत्रालयाची जबाबदारी त्यांना पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. रविशंकर प्रसाद यांनी भाजपचे माजी नेते, काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून पराभव केला आहे. दरम्यान नव्या सरकारच्या मंत्रिमडळाच्या स्थापनेबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

Leave a Comment