आमच्याविरुध्द मोदींनी बहुमताचा वापर करू नये – फारुक अब्दुल्ला


नवी दिल्ली – नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदी कितीही बहुमताने आले आणि त्यांचे सरकार कितीही शक्तीशाली असले तरी ते कलम ३७० आणि ३५-अ हटवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला संसदेत कितीही बहुमत असले तरी त्याने काहीच फरक पडत नाही. त्यांना जम्मू काश्मीरसाठीचे ३७० कलम हटवने शक्य नसल्याचे ते म्हटले आहे.

भाजपसह रालोआला १७ व्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले आहे. तसेच राज्यसभेतही आता भाजपच्या जागा वाढून काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी मोदी सरकारच्या अडचणी दूर होणार आहेत. त्यापैकी जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५-अ मधील तरदुदी रद्द करण्याबाबतच्या निर्णयाचाही समावेश असल्यामुळे ३७० कलमात मोदी हस्तक्षेप करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काश्मीरी नेते फारुक अब्दुल्ला यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशातील जनतेत फूट पाडण्याऐवजी पंतप्रधानांनी त्यांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांनी त्यांना मिळालेल्या बहुमताचा देशाच्या एकतेसाठी वापर करणे योग्य राहील. देशाचे आम्ही सैनिक असून शत्रू नाही. बहुमताचा वापर मोदींनी आमच्याविरुध्द करू नये. कलम ३७० आणि ३५ अ पुर्णत: संरक्षित आहेत. बहुमतात कोणतेही सरकार आले तरी या कलमाला हात लावू शकत नाही. जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी राज्यघटनेत ३७० कलम समाविष्ट केले आहेत. देशाच्या राज्यघटनेने काश्मीरी जनतेला दिलेला तो एक मौलिक अधिकार आहे. कोणालाही बदल त्यात करता येणार नसल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Leave a Comment