कुत्र्याचा आजार बरा व्हावा म्हणून पुण्यातील कुटुंबाचा जागरण गोंधळ


पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यात आला आहे. पुण्यातील एका कुटुंबाने लाडक्या कुत्र्याची आजारपणातून लवकर सुटका व्हावी, यासाठी चक्क जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. एरवी जागरण गोंधळ घालण्याची परंपरा एखाद्या कुटुंबामध्ये लग्नकार्य असेल तर खूप वर्षांपासून आहे. पण हा जागरण गोंधळ एखाद्या कुत्र्यासाठी घातल्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

दोन वर्षे वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे आहे. ब्रुनो असे त्याचे नाव आहे. या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खाता-पिता येत नव्हते. यापूर्वीही जाधव यांच्याकडे रॉटविलर जातीचा कुत्रा होता. पण तो दहा महिन्याचा असताना त्याला गॅस्ट्रो झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. परंतु मुलीला ब्रुनोचा लळा लागल्यामुळे त्यांनी तसाच कुत्रा आणला. परंतु त्यालाही गॅस्ट्रो झाला आणि आठ दिवस काहीही न खाता-पिता तो सलाईनवर होता.

जाधव यांच्या एका मित्राने त्यांना खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिल्यानंतर जाधव यांनी ब्रुनो जर या आजारातून जगला तर जागरण गोंधळ घालू असा नवस जेजुरीच्या खंडोबाला केल्यानंतर ब्रुनो आजारातून पूर्णपणे बरा झाला. त्यांनी बकरे कापून लोकांना जेवू घातले आणि जागरण गोंधळ घालून नवस पूर्ण केला. या जागरण गोंधळासाठी त्यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध गोंधळी अंकू-पंकू यांना बोलावून अगदी थाटात हा नवस पूर्ण केला. या आगळ्या वेगळ्या जागरण गोंधळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Leave a Comment