कोणत्याही रहिवासी पुराव्याशिवायच तुम्हाला बदलता येणार आधार कार्डमधील पत्ता


आपल्या देशात सध्या आधार कार्ड हे अनिवार्य आणि महत्वाचा दस्तावेज झाले आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा वापर केला जातो. आधार कार्ड अनेक महत्वाच्या आर्थिक आणि इतर व्यवहारांसाठी आवश्यक आहे. पण अशा कागदपत्रांमधील माहिती अद्ययावत करणे अनेकदा जिकिरीचे काम ठरते. यावर उपाय म्हणून एक सुविधा आधार कार्ड तयार करणाऱ्या UIDAI ने उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार तुम्हाला तुमचा पत्ता कोणत्याही रहिवासी पुराव्याशिवायच बदलता येणार आहे.

आधारमधील आपला पत्ता अद्ययावत करण्यासाठी UIDAI ने दिलेल्या या सुविधेनुसार यासाठी केवळ 30 दिवसांचा कालावधी लागेल. नागरिकांचा अनेक महिनाभर थांबण्याचा त्रास त्यामुळे कमी होणार आहे. तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की असा कोणताही अधिकृत पुरावा न देता आपला पत्ता कसा बदलणार? पण यावर एक नामी उपाय UIDAI ने शोधला आहे. आपल्या कुटुंबातील एका सदस्याच्या पत्त्याचा उपयोग करुन तुम्हाला तुमच्या पत्त्यात बदल करता येणार आहे. तसेच त्यासाठी वैधता प्रमाणपत्रही मिळवता येणार आहे.

तुम्हाला त्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार वैधता पत्र तयार करण्यासाठी अर्ज करावा लागेल. आधार वैधतेला सहमती मिळाल्यानंतर 30 दिवसांमध्ये पत्ता वैधता पत्र आणि त्याचा गुप्त सांकेतिक क्रमांक (सीक्रेट कोड) संबंधित अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवला जाईल. वैधता पत्र तयार करण्याच्या विनंतीनंतर पत्ता अद्ययावत करण्याच्या परवानगीसाठी एक लिंक आणि SMS पाठवला जाईल. दिलेल्या लिंकवर क्लिक करुन परवानगी देण्यासाठी OTP पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला सीक्रेट कोड येईल. हा कोड UIDAI च्या वेबसाईटवर ‘प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस’ या लिंकवर टाकायचा आहे. त्यानंतर पत्ता बदल करण्याची तुमची विनंती मान्य केली जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ई-आधार ऑनलाईनही डाऊनलोड करता येईल.